

धुळे : पुढारी वृत्तसेवा
मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोळसापाणी या एकाच गावातील मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फोडणारा ठरला. या अपघातानंतर आता सर्वच विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
पळासनेरजवळ झालेल्या अपघातात 10 जणांचा बळी गेला. त्यात कोळसापाणी गावातील पाच जणांचा समावेश आहे. यात संजय पावरा आणि रितेश पावरा या पिता-पुत्रांना मृत्यूने गाठले. धुळे येथे शिकत असलेल्या आपल्या मुलीला हे दोघेही पळासनेर बसथांबा येथे सोडण्यासाठी आले होते. मुलीला खासगी गाडीत बसविल्यानंतर काही वेळ हे दोघे बसथांब्यावरच थांबले होते आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातात आदिवासी आणि कष्टकरी परिवारातील महिला, पुरुष आणि बालकांचा बळी गेला. त्यानंतर आता सर्वच विभागांनी या अपघाताचे विश्लेषण करणे सुरू केले आहे. मात्र निरपराधांचा जीव गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आलेल्या पत्रांची दखल घेऊन या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना केली असती, तर कदाचित या 10 जणांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
पळासनेरजवळील या फाट्यावर यापूर्वी अनेकदा भीषण अपघात झाले. नाशिक जिल्ह्यातील आभोणेतील चौघांचा याच ठिकाणी कार आणि ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या जागेवर नेहमी लहान-मोठे अपघात होतात. महामार्गाचे विस्तारीकरण होताना ही बाब परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर उड्डाणपूल तयार करण्याची मागणीदेखील पुढे आली. मात्र या मागणीवर फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळेच आजचा भीषण प्रसंग घडला असल्याची प्रतिक्रिया या भागातून उमटली आहे.
उतार करतो घात
मध्य प्रदेशातून धुळे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर बिजासनी घाट सेक्शन आहे. अपघात झालेल्या पळासनेर गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या मार्गावर मोठा उतार आहे. हा रस्ता नागमोडी उतार असल्यामुळे उतारावर वाहनचालकांना नियंत्रण करणे कठीण जाते. त्यातच अनेक वाहनचालक इंधन वाचवण्याच्या प्रयत्नात घाटाच्या माथ्यावर आल्यानंतर आपली वाहने बंद करून न्यूट्रल गिअरमध्ये वाहने थेट पळासनेरपर्यंत खाली आणतात. या वाहनांमध्ये असलेल्या लोडमुळे चालकांना वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अपघातग्रस्त ट्रकदेखील अशाच पद्धतीने चालकाने आणल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि 10 जणांचा बळी गेला, असा अंदाज आता बांधला जात आहे.
रस्त्याचे सदोष नियोजन
मुंबई-आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना धुळे जिल्ह्यातील अनेक गावांनी सदोष नियोजनाबाबत संबंधित विभागाला निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर परिणामकारक उपाययोजना अजूनही झालेली नाही. धुळे शहरालगत वरखेडी फाट्यावर आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.