नाशिक : लाला कुडके
येवला तालुक्यातील पूर्व भागात राजापूर येथे बर्याच शेतकर्यांनी मूग पिकाऐवजी यावर्षी कोथिंबिरीची केलेली शेती त्यांना लखपती करून गेली. कोथिंबिरीचे आगार असलेल्या निफाड भागात अतिपावसामुळे कोथिंबीर पीक सडल्याने येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना बिघाभर क्षेत्रातील कोथिंबिरीला 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असून, काही शेतकर्यांना पाच एकरांत कोथिंबिरीमुळे साडेसात लाख रुपये मिळाले आहेत. कांद्यापेक्षा कोथिंबिरीला अधिक उत्पन्न मिळाले आहे.
राजापूर येथील डोंगराळ भागांमध्ये यावर्षी शेतकर्यांनी प्रथमच कोथिंबिरीचा प्रयोग केल्याने शेतकर्यांना कोथिंबीर पिकामुळे जादा उत्पन्न मिळाले. 20 गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या शेतकर्याला एक लाखापर्यंत उत्पन्न मिळाले असून, कोथिंबीर खाती भाव कांदा मागतोय भाव, अशी परिस्थिती आहे. उन्हाळ कांदा साठवूनही अपेक्षेइतका भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर्षी कांद्याला बाजारभाव नसल्याने चाळीतच कांदा सडतो की काय? अशी स्थिती आहे. उन्हाळ कांदा खराब होत आहे. राजापूरला अनेक शेतकर्यांकडे शेततळे असल्याने यावर्षी उन्हाळ कांदा लागवड भरपूर होती. परंतु, उन्हाळ कांद्याने अजूनही एक हजार रुपयांच्या पुढे टप्पा ओलांडला नसल्याने शेतकर्यांनी केलेला खर्चही वसूल झालेला नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी सध्या भाजीपाला पिकाकडे वळत आहेत. तालुक्याचा पूर्व भाग हा कमी पावसाचा भाग आहे. राजापूर परिसरात यावर्षीही दमदार पाऊस नसल्याने तेथील कोथिंबिरीला सुगीचे दिवस आले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशात कोथिंबिरीला मागणी जास्त असून, नाशिक जिल्ह्यातील कोथिंबिरीला चांगला भाव मिळतो.
आम्ही दरवर्षी मूग पीक घेतो. पण, मूग तोडणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने आम्ही मूग या पिकांची पेरणी न करता, कोथिंबिरीचा प्रयोग मागील वर्षीपासून करत आहेत. आमचा एक लाख खर्च झालेला आहे. साडेसहा लाख रुपये नफा मिळला आहे. पहिल्यांदाच एवढे पैसे पिकातून मिळाले आहे. -किसन अलगट, शेतकरी राजापूर.
आमच्या उन्हाळ कांद्याने चाळी भरलेल्या असून, बाजारभाव नसल्यामुळे कांदा चाळीतच सडतो की काय असा प्रश्न आम्हा शेतकर्यांना पडतो आहे. यापुढे शेतकर्यांनी वेगवेगळ्या भाजीपाल्याचे पीक घेतले पाहिजे. -श्रीधर वाघ, शेतकरी राजापूर.
निफाडचे व्यापारी बांधावर दाखल
निफाड तालुक्यातील व्यापारी हे येवला तालुक्याच्या पूर्व भागात उदाडे ठोक सौदा करून व पिकअप गाड्यांसह मजूर आणून कोथिंबीर उपटून घेऊन जात आहेत. राजापूर येथील प्रगतिशील शेतकरी किसन निवृत्ती अलगट यांना पाच एकर कोथिंबिरीचे सात लाख 50 हजार रुपये मिळाले. मागील वर्षी पाच एकरात त्यांनी पाच लाख रुपये उत्पन्न घेतले होते. राजापूर येथे रामभाऊ केदार यांना दोन एकरांत तीन लाख रुपये मिळाले.