Burning Van : म्हसरूळ परिसरात ‘द बर्निंग स्कूल व्हॅन’ चा थरार

Burning Van : म्हसरूळ परिसरात ‘द बर्निंग स्कूल व्हॅन’ चा थरार

Published on

पंचवटी ; पुढारी वृत्तसेवा : म्हसरूळ परिसरात मंगळवारी (दि.२५) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने (Burning Van) भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यात वाहन पूर्णपणे जाळून खाक झाले असून, वाहनातील सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन केअर टेकर्सही सुखरूप बचावल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील रहिवासी अशोक संपत नवले हे आपल्या वाहनात (एमएच १५ जीव्ही ७६६७) त्र्यंबकरोडवरील एक्सप्लेनर हेरिटेज स्कूल येथील तिसरी व चौथीत शिकत असलेल्या मुलांची वाहतूक करतात. मंगळवारी (दि.२५) नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर मुलांना सोडण्यासाठी ते म्हसरूळ परिसरातील टीबी सॅनीटेरियमजवळील रस्त्यावरून जात होती.

त्यावेळी दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांच्या वाहनाने (Burning Van) अचानक पेट घेतला. चालक नवले यांच्या ही बाब लक्षात येताच प्रसंगावधान राखत त्यांनी वाहनातील चार ते पाच मुलांना व विद्यार्थ्यांसोबत असलेल्या दोन केअर टेकर्स महिलांनाही सुखरूप बाहेर काढले. एका जागरूक नागरिकाने कंट्रोल रूमला ही माहिती कळविली.

या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. तातडीने दाखल झालेल्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली खरी मात्र हे वाहन पूर्ण जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचीही मदत

प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक अरुण पवार यांच्या घरासमोरून दिंडोरी रोडकडे जाणाऱ्या रिंग रोडवरच ही घटना घडली. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, त्यांचे पुत्र राहुल पवार व भाजपा युवा पदाधिकारी अमित घुगे यांच्यासह स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या कार्यालयातील कर्मचारी किरण भोईर यांनीही धाव घेत मदतकार्य केले.

अन् पोलीस ठरला 'देवदूत'

बोरगड येथे राहणारे आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात असलेले पोलिस शिपाई अभिजित दळवी हे दुपारी आरटीओतील काम आटोपून घराकडे परतत होते. अचानक त्यांच्या समोरील वाहनाने पेट घेतल्याचे पाहून त्यांनी तात्काळ वाहनातील मुले व केअर टेकर्स महिलांना खाली उतरवत सुरक्षितस्थळी उभे केले. त्यानंतर ही बाब कंट्रोल रूमला कळविली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. अशा कठीण प्रसंगी 'कर्तव्य' बजावणारे पोलीस शिपाई दळवी हे खरोखर देवदूत ठरले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news