

नेवासा: तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील पुलासाठी आमदार विठ्ठल लंघे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निधीची मागणी केली. दरम्यान, प्रवरा नदीवरील पूल झाला, तर गंगाथडी परिसरातील 13 गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी नगर येथे शिवसेना पदाधिकार्यांचा कार्यकर्ता मेळावा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
त्याप्रसंगी आमदार लंघे यांनी तालुक्याच्या प्रलंबित विकासकामाबद्दल त्यांना माहिती दिली. त्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून अर्धवट देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामासंदर्भात पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधले. (Latest Ahilyanagar News)
परिसरातील दहा ते बारा गावांचा संपर्क व दळणवळणासाठी मोठा गंभीर प्रश्न व या संदर्भात बांधकाम विभागाकडून निधी कमतरतेचा प्रस्ताव सादर केला. परिसरातील 13 गावांच्या दळणवळणाची मोठी गैरसोय होत असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले.
देवगडच्या दत्त मंदिर देवस्थानमध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. तसेच परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी व पायी दिंड्या या प्रवरा नदीतून होडीद्वारे धोकादायक प्रवास करतात. त्यांची गैरसोय रोखण्यासाठी पुलासाठी त्वरित निधी देऊन तत्काळ काम सुरू करून भाविकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
पर्यटन मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद!
या नवीन मार्गामुळे परिसराचा अधिकाधिक विकास होऊन दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात पर्यटन मंत्री सकारात्मक असून लवकरच या पूलाचे व प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी निधी देऊ, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
जुना गोधेगाव रस्ता धामोरी मार्गे जोडावा!
प्रवरा नदीवरील पुलाला नेवासा बुद्रुक उपकेंद्राजवळील जुना गोधेगाव रस्ता धामोरी मार्गे जोडला, तर परिसरातील कालभैरवनाथ देवस्थान, नाथबाबा मंदिर देवस्थान ही देवस्थाने जोडली जाणार आहेत. त्याचा फायदा बहिरवाडी, धामोरी, उस्थळ खालसा, सुरेगाव, भालगाव, बेलपिंपळगाव जैनपूर, बेल पांढरी, साईनाथ नगर, टाकळीभान व श्रीरामपूर रोड मार्गे येणारा देवगड परिवार व दिंड्यांसाठी पाच किलोमीटर अंतर कमी होणार आहे.