

आश्वी: संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला करुन 21 मेंढ्या जखमी केल्या. या हल्ल्यात 5 मेंढ्यांसह सुमारे 20 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यानंतर तत्काळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत जखमी 21 पैकी तब्बल 11 मेंढ्यांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकर्यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याने उंबरी- बाळापूर शिवारातील दत्तनगर येथील रहिवासी खंडू होडगर यांच्या गोठ्यातील मेंढ्यांसह कोंबड्यांवर शुक्रवारी पहाटे हल्ला करुन, धुडगूस घातला होता. या हल्ल्यामध्ये 5 मेंढ्यांसह सुमारे 20 गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. (Latest Ahilyanagar News)
यामुळे संदीप होडगर, सुरेश होडगर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वन विभागाला, दहशत निर्माण करणारा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली होती. वन कर्मचार्यांनी दखल घेत, तत्काळ भक्ष्यासह पिंजरा लावला होता.
दरम्यान, शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बिबट्या या पिंजरा अलगद अडकला. जोर - जोरात डरकाळ्या फोटण्यास सुरुवात केली. यामुळे संदीप होडगर यांनी, बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वन कर्मचार्यांनी दिली. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वन कर्मचारी या बिबट्याला संगमनेर येथील रोपवाटिकेत घेऊन गेले.
आणखी मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा संचार सुरुच
उंबरी- बाळापूर परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांची मोठी दहशत पसरली आहे. एक बिबट्या पिंजर्यात अडकला असला तरी, मादी बिबट्यासह दोन बछडे दिवसा राजरोस फिरताना दिसतात. वनविभागाने त्यांनादेखील जेरबंद करुन, शेतकर्यांची दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी सुरेश होडगर यांनी केली आहे.
‘21 मेंढ्यांसह कोंबड्यांवर हल्ला करणारा बिबट्या ‘हाच’ होता का? याबाबत मात्र, अधिकृत खुलासा होऊ शकला नाही. 11 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे, 4 मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे साडेतीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आम्ही कर्ज काढून, मेंढ्या विकत घेतल्या होत्या. वन विभागाने लवकर नुकसान भरपाई द्यावी.
-संदीप होडगर, नुकसानग्रस्त पशु पालक.