

पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथे बुधवारी सकाळी शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेण्यास गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे बाहदराबाद गावावर शोककळा पसरली आहे. गावातील दोन मेहनती आणि होतकरू शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीतराम पाचोरे (वय ३४) यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दोघेही शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेले होते. शेततळ्यावर गेल्यानंतर दीपक पाचोरे यांचा अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. दीपक यांना वाचविण्याच्या प्रयत्नात प्रशांत पाचोरे यांनी शेततळ्यात उडी घेतली. मात्र शेततळ्यात दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. प्रशांत पाचोरे यांच्या पत्नी यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेताचा रस्ता धरला. शेततळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना फवारणीचा पंप आणि इतर साहित्य तळ्यावर पडलेले दिसले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले.
गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शेततळ्यात शोध सुरू केला. काही वेळाने प्रशांत पाचोरे हे बेशुद्ध अवस्थेत पाण्यात आढळून आले. त्यांना बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र दीपक पाचोरे यांचा शोध लागत नव्हता.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. शेततळ्याची खोली आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शोधकार्याला अडचणी येत होत्या. अखेर शेततळ्याचे पाणी कमी करण्यासाठी तळ्याचा बांध फोडण्यात आला.
शोध मोहीमेनंतर दीपक पाचोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बाहदराबादसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मृत प्रशांत पाचोरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, असा परिवार आहे. तर दीपक पाचोरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा तसेच आई-वडील, असा परिवार आहे. दोघेही आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करणारे, शांत आणि मनमिळावू स्वभावाचे शेतकरी म्हणून ओळखले जात होते.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेने शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अनेक शेततळ्यांना कठडे, संरक्षक जाळी, इशारा फलक किंवा बचावासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने अशा दुर्घटना घडत आहे.