

Sina River Fish dead
वाळकी : पावसामुळे शहरातील केमिकलयुक्त व मैलामिश्रित पाणी सीना नदीपात्रात वाहून आल्याने पारगाव मौला, शिराढोण गावच्या क्षेत्रातील नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. दूषित पाण्यामुळे पारगाव मौला बंधार्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगर शहर परिसरात पाऊस झाल्याने सीना नदीतून पाणी वाहते झाले. औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांतील केमिकलयुक्त पाणी, तसेच शहरातील मैलामिश्रीत पाणी सीना नदीपात्रात सोडले जात आहे. हे पाणी पारगाव मौला येथील बंधार्यात आल्याने बंधार्यातील पाणी दूषित झाले. या पाण्यामुळे बंधार्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, माशांचा नदीपात्रात खच पडला आहे. (Ahilyanagar News Update)
350 टीएस क्षार असणारे पाणी शेतीलाही उपयोगी नसते. मात्र, नदीपात्रातील पाण्यातील क्षारांची संख्या 3 हजार 800पर्यंत पोहोचली आहे. केमिकलमुळे नदीतील पाण्यावर फेस निर्माण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नगर तालुक्यातील बुरुडगाव, वाकोडी, वाळुंज, पारगाव मौला, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तिशी, मठपिंप्री, हातवळण ही गावे सीना नदीकाठी वसलेली आहेत. या गावातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बुर्हाणनगर पाणी योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नदीपात्रातील पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना सुरक्षितेसाठी पायात गम बूट घालावे लागत आहेत. पिकांना देत असलेल्या पाण्यात पाय भिजल्यास पायाला भयंकर खाज सुटत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.