गणोरे: गणोरे परिसरात वादळी वार्यासह ढगफुटी सदृश्य जवळजवळ दीड तास पाऊस पडत होता. वादळी वार्याने घरांचे पत्रे उडाली. शेतात असलेल्या कांद्याच्या पोळांमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षा असताना प्रत्यक्ष कांदा बाजारात येताच भाव गडगडल्याने कांदा उत्पादक चिंतेत होते. कांद्याला भाव वाढतील, या अपेक्षेतून कांदा शेतात पडून होता. मात्र काल सोमवारी दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पावसाने शेतकर्यांचे स्वप्नही पाण्यात गेले. (Ahilyanagar News update)
आढळा परिसरातील गेल्या आठ दिवसांपासून सर्वच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. डोंगरगाव, चिकणी, नळवाडी या भागात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. यातून गणोरा परिसर वाचला होता. परंतु सोमवारी अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य वादळी पावसाने गणोरे परिसरात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले.
सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. प्रचंड वादळी वार्याने वीज वितरण कंपनीचे दोन रोहित्र आणि विजेचे पोल पडले आहेत. त्यामुळे गणोरे परिसरात वीज गायब झाली आहे. एप्रिल महिन्यात कांद्याचे भाव वाढतील, या अपेक्षने शेतात कांदा पडून होता.
परंतु एप्रिल महिना संपत आला तरी कांद्याच्या भावात वाढ दिसत नाही. शेतकर्यांचे शेतात पडलेला कांद्याचे पोळ कालच्या पावसाने पाण्यात आहेत. बाजार तळ, मुख्य चौक, सेंट्रल बँकसमोरील रस्ता, माध्यमिक विद्यालय क्रीडांगण सर्वत्र सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. दत्त मंदिर, क्रांती नगर मधील गणोरे संगमनेर या डांबरी रस्त्यावर ओढ्यासारखे दुथडी भरून पाणी वाहिले.
वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसाने येथील रामदास पुंजीराम आंबरे व प्रल्हाद दामोदर वातील, गणेश दिनकर दातीर यांच्या राहत्या घरांचे पत्रे उडाल्याने अख्खा संसार उघड्यावर आला आहे. तसेंच धोंडीबा नामदेव अंबरे, विशाल रामदास खतोडे, गोरख सखाराम आहेर यांच्या घराच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले.
गणोरे परिसरात दुकानात घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानग्रस्त पडझड झालेल्या घराची कामगार तलाठी अमोल गडाख पाहणी केली आहे. परंतु कांद्यासारख्या शेतमालाचाही पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.