

श्रीरामपूर : गोंधवणी भैरवनाथनगर परिसरातील श्रीरामपूर नगरपालिकेचा नव्याने तयार होत असलेल्या पाणी साठवण तलावाचा भराव काल शुक्रवारी पहाटे वाहुन गेल्यामुळे फुटला. त्यामुळे फरगडे वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले. अनेकांच्या शेतात भर उन्हाळ्यात तळ्याचे स्वरूप आले होते. यात कांद्याचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Ahilyanagar News Update)
तलावामध्ये चार महिन्यापूर्वी भराव टाकून तलावाचे दोन भाग करण्यात आलेले आहे. प्रवरा कालव्याद्वारे नुकतेच या तलावामध्ये पाणी भरण्यात आले होते. काल रात्री साडेबाराच्या सुमारास टाकण्यात आलेला भराव खचल्याने तलावाचे दक्षिण बाजूने उतारावर पाण्याचे लोंढे सुरू झाला व सदर पाणी तलावातून बाहेर पडून शेजारच्या शेतात रस्त्यावर तसेच नागरी वसाहत असलेल्या परिसरातील स्वप्न नगरी या वसाहतीत शिरले. रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेला याची कल्पना दिली.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नीलेश बकाल यांनी तातडीने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना याबाबत कल्पना देऊन पाणी रोखण्यासाठी जेसीबी वगैरे उपलब्ध केला. परंतु पाण्याचा दबाव जास्त असल्याने रात्री पाणी रोखण्यात अपयश आले. शेवटी सकाळी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून हे पाणी बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात सुमारे एक कोटी लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे भविष्यात श्रीरामपुरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. पिण्याचे पाण्याचे रोटेशन आता 25 मेच्या दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यातही पावसाळा लाभल्यास रोटेशन लांबण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूरच्या नागरीकांना शनिवारसह दररोज पाणी देण्याच्या हेतूने नव्या तलावाला भराव टाकून त्यात पाणी साठवणे सुरू होते. मात्र,पाण्याचा प्रचंड दाब वाढल्याने भराव फुटुन पाणी वेगाने बाहेर आले. अनेकांच्या घरासमोर पाणीच पाणी झाले. या घटनेची माहिती सरपंच पती प्रवीण फरगडे यांनी मुख्याधिकारी व पालिकेला कळविली. तात्काळ मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप यांनी तसेच पाणी पुरवठा प्रमुख बकाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी जेसीबी लावून भराव बुजविण्याचे व पाणी इतरत्र काढून देण्याचे काम करण्यात आले आहे.