Shrirampur News : अखेर मेनरोडवरील ‘त्या’ अतिक्रमणांवर जेसीबी
श्रीरामपूर : अखेर उच्च न्यायालयाने दिलेली विहित मुदत संपताच, नगरपालिका प्रशासनाने मेनरोडवरील बहुचर्चित अतिक्रमित दुकानांवर जेसीबी फिरवून हटविली. पोलिसांच्या फौजफाट्यासह अतिक्रमणे काढण्यात आली. तत्पूर्वी, दुकानदारांनी दोन दिवसांपूर्वीपासून स्वतः दुकाने काढण्यास सुरुवात केली होती.
अशोक उपाध्ये, रवी गरेला आदी 7 जणांचे लोखंडी मार्केट गेली 30 वर्षांपासून येथे सुरु होते. त्यापूर्वी 20 वर्षे या जागेत हातगाड्यांवर चप्पल विक्रीची दुकाने लावली जात होती.
दोन महिन्यांपूर्वी पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढली, मात्र मेनरोडवरील अतिक्रमणांचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. उच्च न्यायालयाने या दुकानदारांना पुनर्रवसनासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. ही मुदत संपण्यापूर्वीच दुकानदारांनी स्वतः दुकाने हटविण्यास प्रारंभ केला होता. सकाळी 11 वाजता पालिका अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, अभियंता सूर्यकांत गवळी, उप मुख्याधिकारी तापकिरे आदी अधिकारी व कर्मचार्यांनी जेसीबी, ट्रॅक्टरसह इतर फौज फाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
यावेळी अशोक उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेतली. ‘आम्ही दुकाने काढीत आहोत, आम्हाला दोन तासांचा अवधी द्या, आमचे आर्थिक नुकसान करू नका,’ अशी त्यांनी विनंती केली, परंतू तत्पूर्वीच जेसीबीच्या साह्याने काही दुकाने जमिनदोस्त करण्यास प्रारंभ झाला होता. दुकानदारांची विनंती मान्य करून, घोलप यांनी भेट देत, कर्मचार्यांना आर्थिक नुकसान न करता लोखंडी टपर्या काढा, असे आदेश केले. यानुसार अतिक्रमणे काढण्यात आली.
अतिक्रमित दुकाने हटविण्याबाबत मुळ जागा मालकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. स्थानिक न्यायालयाने जागा मालकाच्या बाजूने निकाल दिला होता. यावर दुकानदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, मात्र तेथे दुकानदारांविरोधात निकाल देत, दुकानदारांचे पुनर्रवसन करण्यासाठी न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपताच पालिकेने कारवाईचा बडगा उगारला.
आमचेही पुनर्रवसन करा!
श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील इतर अतिक्रमणे हटविताना, दुकानदारांचे पुनर्रवसन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. मेनरोडवरील या दुकानदारांच्या पुनर्रवसनासाठी या संकुलांमध्ये जागा मिळावी, अशी मागणी अतिक्रमणग्रस्त दुकानदारांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी घोलप यांच्याकडे केली आहे.

