

नेवासा: भालगाव येथील 1 किलोमीटर रस्त्याचे खडीकरणाचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले काम अखेर ग्रामस्थांनी बंद पाडले. या कामाची निःपक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील भालगाव येथील तनपुरे वस्ती रस्त्याचे काम सध्या सुरू होते. हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याबाबत ग्रामस्थांमधून सतत सांगण्यात येत होते. मुख्य रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम बंद पाडले. (Latest Ahilyanagar News)
रस्त्याचे काम धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे खडीकरण चालू होते. हे काम इस्टिमेटप्रमाणे होत नसल्याने काम त्वरित बंद करून उपविभागीय अभियंत्यांनी कामाची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. चौकशी केल्यानंतरच पुढील काम सुरू करू देणार अशी तंबीच नागरिकांनी दिली. या कामाचे ठेकेदाराला कुठलेही बिल अदा करू नये, ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम करत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने याबाबत लक्ष केंद्रित करावे; अन्यथा ग्रामस्थांतर्फे गाव बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे.
निवदेनावर दादासाहेब खरात, रवींद्र राशीनकर, सतीश तनपुरे, दत्तात्रय भागवत, संजय तनपुरे, किरण तनपुरे, बाळासाहेब भांड, जनार्धन मुसमाडे, बाळासाहेब भागवत, गणेश दातीर, प्रवीण खोसे आदींच्या सह्या आहेत.
तनपुरे वस्तीवरील मुले तीन दिवस झाली रस्त्याअभावी शाळेत गेली नाही. वस्तीकडे गाड्या येणे-जाणे बंद आहे. हा रस्ता लवकर झाला तर मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटेल.
- दगडू तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य
हा रस्ता तनपुरे वस्तीवरील मुख्य रस्ता असल्याने हे काम गुणवत्तापूर्वक होणे गरजेचे आहे. गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. अतिशय निकृष्ट काम सध्या सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ आधिकार्यांकडे सोमवारी (दि. 23) तक्रार करणार आहे.
- श्रीकांत भागवत, जिल्हाध्यक्ष ओबीसी, शिवसेना