

दीपक रोकडे
नगर: जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धनात आदर्श काम उभे करणार्या हिवरेबाजार गावाने आता देशापुढे आणखी एक मोलाचे काम उभे केले आहे, ते सेंद्रिय कर्ब प्रयोगशाळा प्रकल्पाच्या माध्यमातून.
गावाने स्थापन केलेल्या देशातील पहिल्या सेंद्रिय कर्ब प्रयोगशाळेत पावसामुळे वाहून जाणार्या मातीबरोबरच वाहून जाणारे सेंद्रिय कर्ब मोजले जात असून, या सेंद्रिय कर्बाची मातीत पुनःस्थापना कशी करता येईल, याचे संशोधन या प्रकल्पात होत आहे. (Latest Ahilyanagar News)
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून हिवरेबाजारमध्ये उभारलेला हा प्रकल्प शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि पर्यायाने अन्नधान्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने आणि नंतर धडाक्यात सुरू झालेल्या मान्सूननेही राज्याच्या बहुतांश भागांना झोडपून काढले. त्यात अनेक ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुराने तडाखा दिला. या तडाख्यात पुराच्या पाण्यात शेतातील सुपीक माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. त्या मातीबरोबरच जमिनीच्या सर्वांत वरच्या थरात असलेला सेंद्रिय कर्बही (ऑरगॅनिक कार्बन) मोठ्या प्रमाणात वाहून गेला.
परिणामी मातीची उत्पादनक्षमता कमी झाली. ही माती आणि त्यासोबत वाहून गेलेला सेंद्रिय कर्ब मोजता आला, तर पावसाने वाहून जाणारी माती रोखण्याबरोबरच मातीत सेंद्रिय कर्ब पुन्हा प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते, या विचारांतून आदर्श गाव हिवरेबाजार येथे भारतातील पहिला सेंद्रिय कर्ब प्रयोगशाळा प्रकल्प स्थापन झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक मदतीने हा प्रकल्प सुरू असल्याचे सांगत पद्मश्री पोपटराव पवार यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली.
पवार म्हणाले, की मातीत किती सेंद्रिय कर्ब आहे, यावर त्या मातीची गुणवत्ता मोजली जाते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मातीचे आरोग्य दर्शविते. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि त्यातील आवश्यक मूलद्रव्यांचे प्रमाण स्पष्ट करते. हे सारे मातीच्या उत्पादनक्षमतेसाठी आवश्यक असते. म्हणूनच मातीतील सेंद्रिय कर्ब कमी झाले म्हणजे माती मृत झाली असे मानले जाते.
हे सेंद्रिय कर्ब मातीत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जमिनीची धूप थांबविणे सर्वांत महत्त्वाचे असते. जमिनीवर जास्तीत जास्त झाडे लावणे त्यासाठी आवश्यक ठरते. वनस्पती हवेतील नायट्रोजन घेऊन मातीला पुरवते आणि विविध मूलद्रव्यांची मातीत पुनःस्थापना होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढू शकते. म्हणून शेतीच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे क्रमप्राप्त ठरते.
हा झाला एक भाग. हिवरेबाजारमध्ये झालेले जलसंवर्धनाचे काम देशासाठी आदर्श ठरले. पण जलसंवर्धन म्हणजे केवळ पाण्याची साठवणूक नाही, तर पाण्याची गुणवत्ता, मातीचे आरोग्य आणि योग्य पीकपद्धती यांचा त्यात अंतर्भाव असतो. हे सारे टिकवण्यासाठी हिवरेबाजारने काम केले आहे. सेंद्रिय कर्ब मोजणी व पुनःस्थापना प्रकल्पात हेच संशोधन सुरू आहे.
हंगामात किती पाऊस पडतो, किती पाणी साचते, किती वाहून जाते, किती पाण्याचे बाष्पीभवन होते, पावसाच्या पाण्यासोबत किती माती वाहून जाते, त्याबरोबर किती सेंद्रिय कर्ब वाहून जाते, याची मोजणी या प्रकल्पात केली जात आहे. एकदा त्याचे निष्कर्ष पुढे आले की मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नांची व्याप्ती वाढविणे सोपे जाईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. हिवरेबाजारचा हा प्रकल्प देशातील पहिला असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठात आणि नंतर राज्यातील उर्वरित तीनही कृषी विद्यापीठांमध्ये तो सुरू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय कर्ब प्रकल्पाचे उद्दिष्ट
हिवरेबाजार येथील सेंद्रिय कर्ब प्रयोगशाळा प्रकल्पाचे टेक्निकल फिल्ड असिस्टंट प्रसन्न पवार यांनी या प्रकल्पाची तांत्रिक बाजू ‘पुढारी’ला सांगितली. ते म्हणाले, की गावाच्या पाणलोट क्षेत्रविकासात नदी खोलीकरण, माथा ते पायथा चर खोदाई, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, यांचा समावेश होतो.
हिवरेबाजार गावाच्या तिन्ही बाजूंना डोंगरांवर ही कामे झाली आहेत. यात किमान नऊ कोटी लिटर पाणी दर वर्षी साचते. बाष्पीभवनाचे एक टक्का प्रमाण गृहीत धरले, तर सर्व पाणी परिसरातच जमिनीत मुरते. झाडा-झुडपांमुळे मातीची धूप होत नाही. परिणामी मातीची गुणवत्ता टिकून राहते.
मात्र जेथे पाणलोट विकासाची कामे झाली नाहीत, तेथे पावसाच्या पाण्याने जमिनीच्या वरच्या 15 सेंटिमीटरची माती (टॉप सॉइल) वाहून जाते. पिकांना आवश्यक असणारी सर्वाधिक मूलद्रव्ये, सेंद्रिय कर्ब याच वरच्या मातीत असतो. तो वाहून गेला, की जमीन नापीक होण्याचा धोका संभवतो.
त्यामुळे वाहून जाणारे पाणी आणि त्याबरोबर वाहून जाणारे सेंद्रिय कर्ब मोजण्याची कल्पना पुढे आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मदतीने जमिनीत सेन्सर बसवून पाण्याची खोली, रुंदी, प्रवाह यांचा डाटा मिळवला जात आहे. पाऊस थांबल्याबरोबर किती पाऊस झाला, किती पाणी आणि माती वाहून गेली, याचा रियल टाईम डाटा मिळवला जातो.
हिवरेबाजार परिसरातील 100 बाय 100 मीटर आकाराची शंभर ठिकाणे निश्चित करून तेथील पावसाआधी आणि पावसानंतरचे नमुने घेतले जातात. त्या मातीची प्रयोगशाळेत तपासणी करून सेंद्रिय कार्बन, पाणी धारण क्षमता, यांचा अभ्यास केला जातो. माती तपासणीची प्रयोगशाळाही हिवरेबाजार येथेच आहे. या प्रकल्पातील सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्बन क्रेडिट आणि आर्थिक लाभ
पाणलोट विकासाबरोबरच वृक्षसंवर्धन उपक्रमामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून गावांना थेट आर्थिक लाभ मिळवता येऊ शकतो, असेही प्रसन्न पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, की कार्बन उत्सर्जन करणार्या कंपन्यांना त्या प्रमाणातच ऑक्सिजन उत्सर्जन केल्याचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. त्याला कार्बन क्रेडिट मिळवणे म्हणतात. त्यासाठी कंपन्यांना वृक्षारोपण करणे क्रमप्राप्त ठरते.
हे कार्बन क्रेडिट अनेक कंपन्या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या विविध संस्थांकडून विकत घेतात. म्हणजे या संस्थांनी केलेल्या वृक्षारोपणामुळे झालेले ऑक्सिजन उत्सर्जन कंपन्यांच्या नावावर पडते आणि त्यांना कार्बन क्रेडिट मिळतात. या व्यवहारातून आर्थिक फायदा होतो. गावांच्या जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धन उपक्रमातून गावाच्या परिसरातील माती कसदार तर होतेच, पण कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून कंपन्यांकडून आर्थिक लाभही मिळू शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
रासायनिक खतांमुळे आधीच मातीचे आरोग्य खालावले आहे. त्यामुळे अशा मातीत पिकणारे अन्नधान्य कसहीन होत आहे. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब अबाधित ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी हिवरेबाजारने हा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.
- पद्मश्री पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती