

जामखेड: जमीन व्यवहारांमध्ये प्रचंड सुलभता आणणारा आणि नागरिकांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचविणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने अंमलात आणला आहे. जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उतार्यावर नाव लावले जाणार आहे. त्यासाठी ’आय सरिता’ आणि ’ई-फेरफार’ या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदविल्यावर अवघ्या वीस-पंचवीस दिवसांत सातबारा उतार्यावर संबंधित खरेदीदाराच्या नावाची फेरफार नोंद होणार आहे. (Ahilyanagar News Update)
ई-फेरफार आणि ’आय सरिता’ या दोन्ही प्रणाली एकमेकांशी संलग्र झाल्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात फेरफारसाठी वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक बनल्यामुळे विनाकारण होणारा विलंब आणि आर्थिक मागणीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. अनेकदा जमीन खरेदी केल्यानंतर सात-बारा उतार्यावर नाव येण्यासाठी दोन-तीन महिने लागत असत. अनेकदा ही प्रक्रिया वर्षभरही प्रलंबित राहत असे. मात्र, आता केवळ 20 ते 25 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरी भागातील मिळकत पत्रिकांवरील फेरफार नोंदीसाठी ’ई-पीसीआयस्री’ ही तिसरी संगणक प्रणालीदेखील या योजनेत जोडण्यात्त ग्रामीण भागासाठी ’सात-बारा’ तर शहरी भागासाठी ’मिळकतपत्रिका’ या दोन्ही प्रक्रियांमध्ये डिजिटल एकात्मता साधली आहे.
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतल्यामुळे भूमिहकांसंदर्भातील प्रक्रियेतील अनावश्यक विलंब, अडथळे आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
तलाठी कार्यालय प्रणालीमधून मिळालेला मजकूर थेट महसूल विभागाच्या ई-फेरफार’ या संगणक प्रणालीमध्ये पोहोचतो. यामुळे जमीन विकणारा आणि खरेदी करणार्या व्यक्तींची नावे, क्षेत्रफळ, बाजारमूल्य, व्यवहाराची तारीख इत्यादी माहिती स्पष्ट असते. ही माहिती मिळताच तलाठी संबंधित पक्षकारांना नोटीस पाठवितात आणि मंडल अधिकान्याच्या मंजुरीनंतर ही नोंद सात-बारा उतार्यावर तत्काळ लागली जाणार आहे.