

आश्वी: विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरीता हक्काचे घर, शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त रहीमपूर येथे भव्य मिरवणूक व आदिवासी एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भगवान वीर एकलव्य, बिरसा मुंडा आणि इतर महामानवांच्या प्रतिमांना वंदन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. हजारो आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि युवक-युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. (Latest Ahilyanagar News)
यावेळी आमदार अमोल खताळ, अॅड. बापूसाहेब गुळवे, मारुती मेंगाळ, शांताराम शिंदे, सविताताई शिंदे, गणपतराव शिंदे, सरूनाथ उंबरकर, आशिष शेळके, विनोद सूर्यवंशी, अनिल बेर्डे, माऊली वर्पे, अरुण शिंदे, सचिन शिंदे, पप्पू गाडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात आला. सत्कार स्वीकारून डॉ. विखे पाटील यांनी आयोजकांचे आभार मानताना, आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. परंतु अनेक दशके हा समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिला. अजूनही 26 गावांतील आदिवासी बांधव अतिक्रमणात व असुरक्षित ठिकाणी राहतात.
पुढील एक वर्षात प्रत्येक गावात शिबिरे घेऊन त्यांना हक्काचे घरकुल, दर्जेदार शिक्षण आणि सरकारी योजना मिळवून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुम्ही माझ्याकडे नोकरीसाठी अर्ज करा, मी माझ्या घरातूनच सुरुवात करून तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन. आपल्या समाजातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले. आदिवासी बांधवांना सन्मान देण्याचे कार्य विखे परिवार करत असताना, आपले महायुती सरकारही आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.