

नगर तालुका: गेल्या अनेक महिन्यांपासून नगर तालुक्यातील जेऊर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कळपाने हिंडणार्या कुत्र्यांपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेऊर परिसरातील सीना नदीपात्र, गावठाण, पाटोळे वस्ती व महावितरण कंपनी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे कळपाने हिंडताना दिसून येतात. याच परिसरात चिकन, मटण, मासे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत. त्यांच्याकडून कुत्र्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांनी आपले ठाण मांडले आहे. (Latest Ahilyanagar News)
जेऊर गावठाणामध्येही मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आढळून येतात. भटक्या कुत्र्यांकडून शेतकर्यांच्या शेळ्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी असणार्या महत्त्वाच्या रस्त्यावरच भटक्या कुत्र्यांचा वावर आहे.
भटक्या कुत्र्यांपासून चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इतरत्र पकडलेली भटकी कुत्रे जेऊर परिसरात आणून सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
रानटी कुत्र्यांची संख्या देखील जास्त!
जेऊर परिसरात असणार्या डोंगररांगांमध्ये रानटी कुत्रेही मोठ्या कळपाने हिंडताना दिसून येतात. त्यांच्याकडूनही पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. डोंगररांगांमध्ये हिंडणार्या रानटी कुत्र्यांची संख्याही जास्त असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.