अकोलेः भारतीय जनता पार्टी व माजी आमदार वैभव पिचड यांचे कट्टर समर्थक वाशेरेगावच्या सरपंचासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत ‘कमळा’ची साथ सोडून मनगटामध्ये ‘घड्याळ’ बांधले आहे.
मुंबई येथे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Latest Ahilyanagar News)
माजी आमदार पिचड यांचे विश्वासू समर्थक, वाशेरेगावचे सरपंच किरण गजे, खरेदी- विक्री संघाचे संचालक कविराज भांगरे, शेरणखेल येथील भाऊसाहेब कासार, राजाराम कासार, उप सरपंच संतोष वाक्चौरे, मनोहरपुरचे उप सरपंच रमेश भांगरे, यशवंत डोळस, पांडुरंग भांगरे, गजानन कातळे, नवनाथ करवंदे, प्रफुल्ल भांगरे, किरण कोंडार, बाजीराव सदगीर, रविंद्र साबळे, तेजस मेंगाळ, भाऊसाहेब तळपाडे व मदन डगळे या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीसह विचारांवर प्रभावित होवून, माजी आमदार पिचड यांची साथ सोडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उप मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष शरद चौधरी, शहराध्यक्ष अक्षय अभाळे, मुकूंद लहामटे, ईश्वर वाक्चौरे, डॉ. अविनाश कानवडे आदी उपस्थित होते.