

नगर: पावसाळ्यातील एक महिना संपला तरीही जिल्ह्यातील 27 गावे आणि 142 वाड्यांत पाणीटंचाई सुरुच आहे. या टंचाईग्रस्त गावांसाठी 26 टँकर धावत आहेत. मात्र, टंचाई उपाययोजनेची मुदत 30 जूनपर्यंत असल्याने 1 जुलैपासून टँकर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या टंचाईग्रस्त गावांत पाणी परिस्थिती कशी आहे. याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली तरीही संगमनेर, अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाई उपायोजनांचा कृती आराखडा तयार केला जातो. या माध्यामातून टंचाईग्रस्त गावांना 30 जूनपर्यंत टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Latest Ahilyanagar News)
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. मार्च महिन्यात संगमनेर तालुक्यातील सायखिंडी या गावात पहिल्यांदा पाणीटंचाई निर्माण झाली. त्यानुसार मार्च महिन्यात पाण्याचे टँकर सुरू झाले. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात टँकरचा आकडा 181 वर पोहोचला होता. या टँकरद्वारे संगमनेर, अकोले, अहिल्यानगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आदी आठ तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पारनेर शहरात देखील पाणीटंचाई निर्माण झाल्याने शहरात 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
जून महिन्यात सरासरी 108.7 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त 80.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्यात सरासरी 61.7, पाथर्डी तालुक्यात 46.7 टक्के तर संगमनेर तालुक्यात 107 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यांतील पावसाची दमदार नोंद नसल्यामुळे तीन तालुक्यांतील 27 गावे आणि 142 वाड्यांत अद्याप टंचाई परिस्थिती आहे. त्यामुळे या टंचाईग्रस्त गावांत 30 जूनपर्यंत 26 टँकर धावत होते. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 8, शेवगाव तालुक्यातील 9 तर पाथर्डी तालुक्यातील 9 टँकरचा समावेश आहे.
मात्र, टंचाई उपाययोजनेचा कालावधी 30 जूनपर्यंत असल्यामुळे या तीन तालुक्यांतील टँकर 1 जुलैपासून बंद करण्यात आले आहेत. या तीनही तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांतील पाणी परिस्थिती तपासणी करण्याचे निर्देश प्रांताधिकार्यांना दिले आहेत. टंचाई परिस्थिती असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास टँकरला मुदतवाढ दिली जाणार आहे.
मे महिन्यातील पावसाने टँकरची संख्या घटली
2024 मध्ये मेअखेरीस तीनशे टँकर सुरू होते. यंदा मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात टँकरचा आकडा 181 च्या आसपास होता. परंतु मे महिन्याच्या तिसर्या आणि चौथ्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. मे महिन्यात सरासरी 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्यास मदत होऊन टँकरची संख्या कमी झाली. जून महिन्यात 20 टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे संगमनेर, शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अद्यापही पाणीटंचाई कायम आहे.