

चौंडी (विशेष प्रतिनिधी)
राज्य मंत्रिमंडळाने चौंडीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात वैद्यकीय महाविद्यालय, राहुरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, अहिल्यानगर शहरात मुलींसाठी आयटीआय निर्मितीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतुद करण्यात आल्याचे सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, या बैठकीत जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टी जतन व संवर्धनासाठी निधी देण्यात आला.
त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगरकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती. त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत मोहर उमटविण्यात आली. अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करणार येणार आहे. त्याची क्षमता साधारण 100 विद्यार्थ्यांची असणार असून, त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी सुमारे 485 कोटी 8 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती व पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. (Ahilyanagar News Update)
अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक 27 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची 12 अशा एकूण 39 पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी 232.01 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्री व इतर खर्चासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 11 कोटी 80 लाख 19 हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
राहुरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजुरी देण्यात आली. सध्या राहुरी येथे चार दिवाणी न्यायालये कनिष्ठ स्तर कार्यरत आहेत. त्यापुढील स्तरावरील येथील प्रकरणे अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे चालविली जातात. या न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणाची संख्या अनुक्रमे 9 हजार 235 व 21 हजार 842 आहेत. राहुरी तालुक्यातील नागरिकांना सुलभरित्या न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.