

सोनई: येथील महावीर पेठेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी उभारलेल्या लोखंडी खांबांच्या पहाडाला विजेची तर चिकटलेली होती. त्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून सात वर्षे वयाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर राहुल वैरागर असे त्याचे नाव आहे.
महावीर पेठेतील विठ्ठल मंदिराशेजारील चालू असलेल्या बांधकामावर अनेक दिवसांपासून बांधलेल्या लोखंडी पहाडाजवळून गेलेल्या विजेच्या तारांचे आवरण घासून घासून निघालेले होते. यामुळे या लोखंडी पोलमध्ये वीजप्रवाह उतरल्याचे प्रथमदर्शनी समजते.
मंगळवारी (दि ३०) सायंकाळी सहा वाजता अंबिकानगर येथील दोन लहान मुले रस्त्यावर जात असताना या खांबाला ईश्वरचा हात लागला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोजंदारीवर मोलमजुरी करून कुटुंब चालवत असलेल्या राहुल वैरागर यांचा ईश्वर मुलगा होता. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा येथे पाठविण्यात आला.