

श्रीरामपूर: स्वीफ्ट डिझायर कारमधून जाणाऱ्या एका तरुणास काही जणांनी रस्त्यात अडवून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे तरुणावर कोयत्याचा वार करण्यात आला, मात्र सुदैवाने तरुणाने हल्ला चुकवला. यामुळे त्याला दुखापत झाली नाही. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाबीर शब्बीर कुरेशी (वय 38, रा. श्रीरामपूर) हा तरुण वॉर्ड नं.2 येथील घरापासून बीफ मार्केट चौकाकडे कारमधून जात असताना, सर्फराज बाबा शेख, इरफान मोईनुद्दीन शेख ऊर्फ इप्या, लुकमान इसाक शाह, राहुल भिमा सोनवणे, अर शेख (संपुर्ण नाव माहीत नाही) यांनी शाबीर याची कार अडवली. खाली उतरून त्याने कारण विचारले असता, त्याला धक्काबुक्की करण्यात आली.
‘आम्हाला 50 हजार रूपये द्यायला सांगितले होते. ते तू कधी देणार?’ असे विचारले असता, ‘माझ्याकडे पैसे नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे शिवीगाळ करून, कोयता दाखवून धमकावण्यात आले. ‘या एरियात आम्हीच फक्त दादा. आमच्या विरोधात कोणी गेले तर, तुकडे करू,’ असे धमकावत बंदुकीसारखे हत्यार रोखण्यात आले.
‘तुला येथे रहायचे असेल तर, 50 हजार रूपये द्यावेचं लागतील,’ असे म्हणत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता डोक्यावर मारला, मात्र तरुणाने वार हुकवला. कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करीत, पाठीमागून कारवर काहीतरी फेकून मारले असता, शबीर याने तेथून पळ काढला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शाबीर कुरेशी याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सर्फराज बाबा शेख, इरफान मोईनुद्दीन शेख ऊर्फ इप्या, लुकमान इसाक शाह, राहुल भिमा सोनवणे, अर शेख (संपुर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.