

नगर : तीन महिन्यांपूर्वी शिर्डी येथून सराफ व्यापार्याचे 3 कोटी 26 लाख रुपयांचे किंमतीचे 2687 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कमेची चोरी झाली होती. याप्रकरणात संबंधित व्यापार्याच्या चालकानेच संबधित ऐवज घेऊन शिर्डीतून पलायन केल्याचे समोर आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून काल त्याला ताब्यात घेतले आहे. (Latest Ahilyanagar News)
विजयसिंह वसनाजी खिशी, (वय 35, धंदा सोने व्यापारी, रा. आवाल घुमटी, ता. अमिरगढ, गुजरात) हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करतात. ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यवसायिकांकडे सोने विक्रीसाठी येतात. 13 मे 2025 रोजी खिशी व त्यांचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान) हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या चालकाने 3 कोटी 26 लाख रूपयांचे दागीने व रोख रक्कम चोरून पळून गेला होता. शिर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली आरोपीच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार अमृत आढाव, भगवान चोरात, प्रशांत राठोड यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले. पथकाने गुप्त बातमीदाराची माहिती तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढून सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित यास गुजरात येथून ताब्यात घेतले. त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी चालक सुरेशकुमार याने चोरी केल्यानंतर दागिण्यांची बॅग घरात टाकून पलायन केले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यातील सोने पोलिसांना परत केले. मात्र 600 गॅ्रम सोने आणि चार लाखांची रोकड जप्त करणे बाकी आहे. पोलिस तपासात याचाही उलगडा होणार आहे.