

सातारा : बीड जिल्ह्यातील आमचा दुष्काळी भाग. शिकून डॉक्टर व्हायची पोरीची उमेद. जिल्हा परिषदेच्या शाळेतच ती शिकली. शेतीच्या भरवशावर कुटुंबियांनी तिला डॉक्टर करायच ठरवलं. शैक्षणिक कर्ज काढलं. पैकं जमवलं अन् ती डॉक्टर झाली. पण तिच्या नशिबी काय हे आलं? यामध्ये जे-जे दोषी असतील त्यांना फासावर लटकवा. हीच तिला श्रध्दांजली असणार आहे, असा संताप सिव्हीलमध्ये नातेवाईकांनी केला.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने या युवतीने हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह सातारा सिव्हील रुग्णालयात आणला. यावेळी मृत युवती डॉक्टरचे काका, आतेभाऊ होते. गावाकडची ही साधी माणसं. हाता-खांद्यावर जी पोरगी वाढली तिचा मृतदेह पाहून नातेवाईक हादरुन गेले होते. पोरगी या जगात नसल्याने ते सैरभैर झाले होते. ज्यांच्यामुळे तिने गळफास घेतला त्यांच्याबद्दल संताप व्यक्त होत होता. पोरीचा कसा छळ झाला आहे. तिला किती मानसिक त्रास झाला आहे ही एकएक बाजू त्यांना समजत गेल्यानंतर संताप वाढतच गेला.
गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर युवती फलटण येथे रुजू होती. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबियांना देखील ती तणावात असल्याचे लक्षात आले होते. कुटुंबातील काही सदस्यांसोबत तसे बोलणे झाले होते. तिला चुकीचे करायला भाग पाडले जात होते. पोलिसांकडून आणि राजकारण्यांकडून दबाव आणून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आरोग्य विभागाचे त्यांना हवे तसे मेडिकल रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला जात होता. या चुकीच्या गोष्टींना ती विरोध करत होती. यातूनच ती तणावात गेली व ही घटना घडली. या पाठीमागे असलेल्या प्रत्येकांना अटक व्हावी. पोलिसांनी तपासात कोणताही हलगर्जीपणा करु नये, अशी मागणी मृत डॉक्टर युवतीच्या आतेभावाने दै.‘पुढारी’ सोबत बोलताना केली.
पीडित डॉक्टर युवतीचे वडील शेतकरी आहेत. तिला दोन भाऊ असून तीच मोठी होती. बहिणीचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून एक भाऊ वडीलांसोबत शेती करत आहे. तर दुसरा भाऊ शिक्षण घेत आहे. दरम्यान, नात्यातील एक बहिण मेडीकल ऑफीसर आहे.
2022 मध्ये झाली होती डॉक्टर
पीडितेचे प्राथमिक शिक्षण गावी झाल्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक बीडमध्ये झाले. दहावीतच डॉक्टर व्हायचे ठरल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश करुन अभ्यासाला सुरुवात केलेली. बारावीत एन्ट्रान्स दिल्यानंतर एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी जळगाव येथे प्रवेश निश्चित झाला. 2022 रोजी तिच्या घरातील ती पहिली डॉक्टर झाली होती. यामुळे आई-वडीलांचा उर भरुन आला होता.