

खेड : खेळाडू घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेकडे पाठ फिरवत असतील तर मुलांनी काय शिकायचे? असा संतप्त सवाल विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींनी उपस्थित केला आहे. कारण, जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शासकीय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जबाबदार अधिकारी एकाही दिवशी उपस्थित राहिले नाहीत. (Latest Ahilyanagar News)
खेड (ता. कर्जत) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात 8 ते 12दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. खेळाडूंनी मेहनत, जिद्द आणि कौशल्य दाखवले. गावोगावच्या शाळांनीही उत्साहाने सहभाग घेतला. मात्र, या मेहनती मुलांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायला जबाबदार अधिकारी मैदानावर कुठेच दिसले नाहीत.
स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, तालुका क्रीडाधिकारी प्रियांका खिंडरे आणि गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांची नावे झळकली होती. पण प्रत्यक्ष मैदानात या तिघांची एकदाही उपस्थिती नोंदली गेली नाही. एवढेच नव्हे, तर खेडमधील क्रीडा शिक्षकांनी दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी पालक-शिक्षकांचा संताप आणखी वाढला.
स्पर्धा फक्त पंचांच्या आणि लोकनायक शाळेच्या खांद्यावर पार पडली. शेवटच्या दिवशी पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. पालक व खेळाडूंनी तक्रारी केल्या, मात्र ऐकून घेणारे व तोडगा काढणारे मैदानात कोणीच नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खेड संस्थेचे सचिव मकरंद सप्तर्षी यांच्या निमंत्रणावरून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव व अपेक्स कमिटी मेंबर शुभेंद्र भांडारकर, भारतीय सॉफ्टबॉल संघाचे माजी कर्णधार व पुणे सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अतुल शिंदे आणि एमसीएचे प्रशिक्षक तेजस मातापूरकर हे उपस्थित राहिले. त्यांनी मुलांशी संवाद साधून प्रेरणा दिली.
मात्र, ज्यांची उपस्थिती सर्वाधिक गरजेची होती ते अधिकारी मात्र मैदानापासून कोसो दूरच राहिले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार्यांनाच खेळात रस नसेल, जबाबदार अधिकारीच जर महत्त्वाच्या स्पर्धेला दांडी मारत असतील, तर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अशा निष्काळजी अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच कार्यतत्पर अधिकारी नेमावेत, अशी पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींची जोरदार मागणी होत आहे.