

अकोले: तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार, दि. 23) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवान संदीप गायकर भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते. गुरुवारी पहाटे या बटालियनची दहा जणांची तुकडी सीमेवर तैनात होती. त्यात जवान संदीप गायकर हेही कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात गायकर शहीद झाले. त्यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले.
संदीप गायकर हे अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ होते. त्यांच्या बलिदानाने ब्राह्मणवाडा गावासह संपूर्ण अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.