

अहिल्यानगर, पुढारी वृत्तसेवा : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला कोणतीच मान्यता नाही, असे कुस्तीगीर संघांचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील दोन कुस्तीसंघाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. (Sandeep Bhondwe on Rohit pawar)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका पैलवानांना बसताना दिसतोय. रामदास तडस यांच्या संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच नगर शहरात पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड मध्ये ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्यात केले आहे.
नगर शहरात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड मध्ये घेणार असल्याची घोषणा रोहित पवार यांनी केली होती. यानंतर आता पवार यांनी घोषणा केलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही, अशी प्रतिक्रिया भोंडवे यांनी दिली आहे.
यामध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर आली असून कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या पैलवानांना फक्त प्रमाणपत्र मिळेल. मात्र, या प्रमाणपत्राचा उपयोग पुढे ऑलम्पिक स्पर्धेसाठी अथवा भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी होणार नाही. तसेच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी सरकारी कामकाजात कुठेही या प्रमाणपत्राचा उपयोग होणार नाही. त्यामुळे ही कुस्ती स्पर्धा होणारच नाही आणि झाली तरी त्या प्रमाणपत्रांचा काही उपयोग नसेल, अशी माहितीही भोंडवे यांनी दिली आहे.
रामदास तडस हे आपली कुस्ती संघटना ही अधिकृत आहे, असे सांगतात. तर दुसरीकडे आपलीच संघटना ही खरी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद असल्याचा दावा बाळासाहेब लांडगे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन कुस्ती संघटनांच्या वादात महाराष्ट्रातील पैलवान कात्रीत सापडले आहेत.