

जामखेड : आ. रोहित पवार गटाचे बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा यांनी रोहित पवार यांना सोड चिट्टी देत विधानपरिषदेचे सभापती आ. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थित भाजप मध्ये पक्ष प्रवेश केल्याने आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी मतदारसंघाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व आ. रोहित पवार यांच्या गटाचे राहुल बेदमुथा यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी उपस्थित जेष्ठ नेते तथा संचालक अंकुशराव ढवळे पाटील, सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे उपस्थित होते.
जामखेड बाजार समिती मध्ये आ. रोहित पवार व आ. प्रा राम शिंदे यांना बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांपैकी दोन्ही गटाला समान ९ समान ९ जागा जिंकल्याने पेच निर्माण झाला होता. त्यावेळेस चिट्टी द्वारे सभापती पदाची चिट्ठी काढण्यात आली होती. त्या चिट्टी द्वारे आ.राम शिंदे यांच्या गटाचे सभापतीपदी शरद कार्ले यांची तर उपसभापती पदी आ.रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची चिट्टीद्वारे वर्णी लागली होती.
बाजार समिती मध्ये काम करताना ठराव करताना समान ९ – ९ संचालक असल्याने अनेक कारभार करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे काही वेळा घेतलेले निर्णय देखील माघारी घेण्याची नामुष्की आली होती. ९ – ९ संचालक असल्याने कारभार करताना तारेवरची कसरत सभापती शरद कार्ले यांना करावी लागत होती. त्यामुळे आ. रोहित पवार गटाच्या बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा हे भाजपच्या गळाला लागल्याने भाजपचे बाजार समितीमध्ये बहुमत होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना आ. रोहित पवार यांना धक्का बसल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे या प्रवेशावरून दिसत आहे. बाजार समितीचे संचालक असलेले अंकुश ढवळे देखील विधान सभेच्या निवडणुकीपासून आ. राम शिंदे यांच्या बरोबर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजार समिती मध्ये आ. राम शिंदे यांच्या गटाचे ११ तर आ. रोहित पवार गटाकडे ७ संचालक राहणार असल्याचे दिसत आहे.