

जामखेड: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... गहिनीनाथ महाराज की जय... संत वामनभाऊ महाराज की जय... या जयघोषाने गुरुवारी (ता. १६) शहरालगतचा जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड परिसर दुमदुमून गेला. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले.
वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे.
गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी आणि मातकुळीमार्गे प्रवास करत पालखी गुरुवारी जामखेडमध्ये दाखल झाली. शहरात प्रवेश करताच तपनेश्वर येथे श्री नागेश्वर भजनी मंडळाने टाळ-मृदंग, वीणेच्या गजरात भजन करून पालखीचे स्वागत केले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
या वेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखीचे स्वागत केले. शहरभर महिलांनी सडा-रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले, तर विविध सामाजिक संस्था व नागरिकांनी वारकऱ्यांसाठी फळे, चहा, नाश्ता, औषधे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. श्री विठ्ठल मंदिरात दिंडीचे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आष्टीचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विणेकऱ्यांच्या सुरेल साथीत गोल रिंगणाला सुरुवात झाली. पताकाधारी वारकरी वेगाने पालखीभोवती प्रदक्षिणा घालत असताना उपस्थित भाविकांनी हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
विठ्ठल महाराज यांनी अभंग गायन केले. त्यांच्या अभंगांच्या चालीवर वारकऱ्यांनी पारंपरिक खेळ सादर केले, तर महिला व पुरुष भक्तांनी फुगडी खेळत भक्तीचा आनंद लुटला.