

श्रीगोंदा: सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट झाला. तालुका वैभवाच्या शिखरावर उभा राहिला आहे. या सहकार गंगोत्रीचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्याकरिता सभासद व ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025--26 या 51 व्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मिल रोलर पूजन अध्यक्ष नागवडे, संचालक सावता हिरवे व प्रवीण लबडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. (Latest Ahilyanagar News)
नागवडे म्हणाले, खासगी कारखान्यांशी स्पर्धा करताना सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक आव्हाने उभी आहेत. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. मात्र, गाळप हंगामाचे दिवस कमी होत आहेत. पूर्वी 170 ते 190 दिवस हंगाम चालत होता. आता 110 ते 120 दिवसापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक संतुलन राखणे कठीण झाले आहे.
परंतु स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी साठ वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या कारखान्याचा 51 व्या हंगामाचा रोलर पूजन आज आपण करत असताना आनंद होत आहे. त्यांचे विचार आणि संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन व सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकर्यांना सातत्याने चांगला भाव देऊन न्याय देण्याची यशस्वीपणे भूमिका पार पाडली आहे.
भोस म्हणाले, स्वर्गीय बापूंचा विचार आणि वारसा घेऊन राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक एकदिलाने काम करून जिल्ह्यात अग्रेसर ऊस भाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रास्ताविक संचालक भाऊसाहेब नेटके यांनी केले. शरद जगताप यांनी आभार मानले. यावेळी संचालक श्रीनिवास घाटगे, राकेश पाचपुते, प्रशांत दरेकर, योगेश भोईटे, डी. आर.काकडे, प्रा. सुरेश रसाळ, बंडू जगताप, संदीप औटी, दत्तात्रय कातोरे यांच्यासह सरपंच प्रवीण शिर्के व, प्रा. भगवान शिर्के, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्यासह सर्व खाते प्रमुख कामगार व सभासद उपस्थित होते. यावेळी केनयार्ड विभागातील भाऊसाहेब पडळकर, हनुमंत काळे व उत्तम दरेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
ऊस भावात पुढेच राहू: नागवडे
भविष्यातही नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही. परंतु सभासद शेतकर्यांनी मात्र आपला ऊस आपल्या कारखान्यास गळितास देऊन सहकार्य आहे. सन 2025-26 चा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागवडे यांनी केले.