

राहुरी: राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स येथे काल रविवार दि. 29 जून रोजी एका विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले.
राहुरी फॅक्टरी परिसरातील एका गावात एक लग्न समारंभ होता. या लग्न सोहळ्यासाठी नगरहून वर्हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्या प्रमाणे दि. 29 जून 2025 रोजी दुपारच्या सुमारास लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला. (Latest Ahilyanagar News)
सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. परंतु नंतर या वादाचं रूपांतर बेदम हाणामारीत झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरहून आलेल्या वर्हाडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं स्वरूप आले होते.
शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली आणि वर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. जखमी झालेल्या तरुणांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या लग्न सोहळ्याची तालूक्यात चर्चा सुरु आहे.