Rahuri Mystery Case: धक्कादायक रहस्य! दफन केलेली व्यक्ती जिवंत घरी परतली; मग कबरीत कुणाचा मृतदेह?

सत्याचा शोध घेण्यासाठी आता ती कबर उकरण्याची वेळ प्रशासनावर आली.
Rahuri Mystery Case
Rahuri Mystery CasePudhari
Published on
Updated on

सोनगाव: सोनगाव (ता. राहुरी) येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह प्रशासनालाही हादरवून सोडले आहे. हरविलेली व्यक्ती मृतावस्थेत आढळली. धार्मिक विधीनुसार तिचे दफन केले; मात्र काही दिवसांनी हरवलेली ती व्यक्ती घरी आली. मग दफन केलेला मृतदेह कुणाचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी आता ती कबर उकरण्याची वेळ प्रशासनावर आली.

सोनगाव येथील शब्बीर जमादार मन्सूरी हा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची मानसिक स्थिती सामान्य नसल्याचे सांगितले जाते. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.

Rahuri Mystery Case
Ahilyanagar Yellow Alert: नगर जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट'

त्याच काळात परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. प्राथमिक ओळख आणि उपलब्ध माहितीनुसार तो मृतदेह शब्बीरचा असल्याचा निष्कर्ष त्या वेळी काढल्याचे सांगितले जाते.

पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी तो शब्बीरचा असल्याच्या समजुतीत धार्मिक परंपरेनुसार त्याचा दफनविधी केला. गावानेही घटनेला अंतिम सत्य मानले.

मात्र काही दिवसांनी घटनाक्रमाला नाट्यमय वळण मिळाले. शब्बीर प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले. समाजमाध्यमांद्वारे माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यानंतर व्हिडीओ कॉलवर त्याची ओळख पटली आणि त्याला घरी आणले.

शब्बीरच्या पुनरागमनामुळे प्रशासनासमोर मोठे प्रश्न उभे राहिले. दफन केलेला मृतदेह कुणाचा होता? ओळख प्रक्रियेत कोणत्या निकषांचा आधार घेण्यात आला? वैज्ञानिक पुरावे तपासले होते का? या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शब्बीर समजून पुरलेला तो मृतदेह उकरण्याची वेळ प्रशासनावर आली.

Rahuri Mystery Case
Pandharpur Wari 2026: वारकऱ्यांच्या स्वागतास जिल्हा परिषद सज्ज

पंच, पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून पुढील तपास, वैद्यकीय परीक्षण आणि आवश्यक वैज्ञानिक पडताळणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सत्य कबरीत आहे, की नोंदीत?

ही घटना केवळ एका कुटुंबाला भावनिक धक्का नाही, तर मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया, हरविलेल्या व्यक्तींची नोंद, वैद्यकीय पडताळणी आणि प्रशासनिक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे, सत्य कबरीत आहे, की नोंदीत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news