नगर: नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून, त्याची दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेस मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. या आपत्तीमध्ये रस्ते, पूल, स्मशानभूमी, बंधारे, घाट, वस्ती जोड रस्ते आदी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत. (Latest Ahilyanagar News)
सादर करण्यात आलेली ग्रामपातळीवरील कामे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पूर, चक्रीवादळ आदी आपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण व दुरुस्तीअंतर्गत प्रस्तावित करता येतील याकडे खा. लंके यांनी जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले.
ही कामे मार्गी लावल्यानंतर या गावांतील ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे या कामांच्या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधींतर्गत तातडीने मंजुरी देण्यात यावी व कार्यवाहीस गती देण्यात यावी, अशी मागणी खा. नीलेश लंके यांनी केली आहे.
प्रस्तावित केलेली विविध कामे:
सारोळा कासार: स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण, काळे वस्ती येथील दोन पुलांची दुरुस्ती, दशक्रिया विधी घाट दुरुस्ती व सुशोभीकरण, बारे मळा शाळेसमोर व दत्त मंदिरासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सारोळा गावठाण ते कडूस वस्ती रस्ता दुरुस्ती करणे.
अस्तगांव: स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण, स्मशानभूमीशेजारील रस्ता व सीडी वर्क, अस्तगाव गावठाण ते तरोडी रस्ता दुरुस्ती, गावठाण ते गाढवे वस्ती रस्ता दुरुस्ती.
खडकी: स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण, खडकी ते जाधव मळा रस्ता व सीडी वर्क, खडकी सोसायटी ते नगर दौंड महामार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण.
वाळकी: वाळकी ते गुंडेगाव रस्ता व सीडी वर्क, गावठाण ते अमरधाम रस्ता दुरुस्ती, जुंदरे मळा रस्ता दुरुस्ती, बोठे वस्ती, जुंदरे वस्ती, अमरधामजवळील बंधारे दुरुस्ती.
भोरवाडी: वडवस्ती ते खैरे वस्ती रस्ता दुरुस्ती, नवीन खडकवाडी पूल दुरुस्ती व सीडी वर्क, गावठाण ते घुले वस्ती रस्ता दुरुस्ती.
अकोळनेर: गावठाण ते मेहेत्रे वस्ती रस्ता व 3 ठिकाणी सीडी वर्क, जाधववाडी रस्त्यावर 2 ठिकाणी सीडी वर्क, दरोडी मळा, थोरात वस्ती, देशमुख मळा रस्ते दुरुस्ती.
सोनेवाडी: सोनेवाडी-जाधववाडी रस्त्यावरील पूल, सीडी वर्क, बोगरे हॉस्पिटल ते कुबाडे मळा रस्त्यावरील सीडी वर्क, दरेवस्ती, पाटील मळा, गोपाळ वस्ती, दळवी वस्ती येथे सीडी वर्क.