

नगर: गांजाच्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या बदल्यात सहाय्यक फौजदाराकरीता मध्यस्थी करत दीड लाखाची लाच स्वीकारणार्या राजकीय नेत्यासह सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तसा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आशोक रामचंद्र गायकवाड (रा. बिशप लॉईड कॉलनी) असे राजकीय नेत्याचे तर राजेंद्र प्रभाकर गर्गे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. गायकवाड हे रिपाईचे नेते होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. (Latest Ahilyanagar News)
कोतवाली पोलिस ठाण्यात गांजीची केस दाखल आहे. त्यात आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात गायकवाड यांनी सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्याकरीता मध्यस्थी केली. बुधवारी (दि.20) गायकवाड यांनी तक्रारदारांकडे पाच लाखाची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख लाच देण्याचे ठरले.
लाच मागणीला सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे चौकशीत समोर आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.21) सापळा रचला. तक्रारदार लाचेची रक्कम अशोक रामचंद्र गायकवाड यांना देण्यासाठी गेले असता त्यांनी ती स्वीकारली.
त्यानंतर दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तोफखाना पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटकेतील दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गर्गेची घरझडती
सहाय्यक फौजदार गर्गे यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. त्यात फारसे काही आढळून आले नाही. गायकवाड हे खासगी व्यक्ती असल्याने त्यांची घरझडती घेता आली नाही.