

पाथर्डी: गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. त्यामुळे पालिकेने आवश्यक कामे पूर्ण करावीत. विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून पथदिवे त्वरित सुरू करावेत, तसेच जुन्या बसस्थानकात फिरते शौचालय उभारा, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या.
पाथर्डी पोलिस ठाण्यात गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. (Latest Ahilyanagar News)
या वेळी तहसीदार डॉ. उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, मयूर जाधव, विष्णूपंत अकोलकर, शिवशंकर राजळे, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बंडूपाटील बोरुडे, नासिर शेख, संजय मरकड, देवा पवार, मन्सूर पठाण, हुमायून आतार, सचिन वायकर, सोमनाथ जिरेसाळ, अॅड.प्रतीक खेडकर, अविनाश पालवे, डॉ. रमेश हंडाळ, रमेश गोरे, बबन बुचकुल, महेश बोरुडे, डॉ. रामदास बर्डे, प्रा. सुनील पाखरे, अशोक मंत्री, आतिष निर्हाळी, जमीर आतार, मंगल कोकाटे, ज्योती शर्मा, गुप्त वार्ताहाचे नागेश वाघ, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद, बाबासाहेब बडे आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, बाजारतळावर उभारलेले स्वच्छतागृह नळचोरीमुळे बंद आहे. जुन्या बसस्थानकासाठी निधी दिला होता, पण स्थानिक व्यापार्यांनी काम सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे फक्त प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. मंडळांनीही उत्सवाचे पावित्र्य जपले पाहिजे.
बैठकीत गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी डीजे परवानगी, सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गणेशोत्सव काळात एसटी बसेस कोकणात न पाठवणे, खिसेकापूंचा बंदोबस्त करणे व महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह उभारणे यासारख्या मागण्या मांडल्या. ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने उशिरा मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे आमदार राजळे यांनी नमूद केले. मंडळांनी उत्सवाचे पावित्र्य जपावे. कमी वेळेत मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.