

पाथर्डी: शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात गुरुवारी (दि. १९) पोलिसांनी मोठी मोहीम उघडली. स्थानिक गुन्हे शाखा, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाथर्डी पोलीस स्टेशन अशा चार स्वतंत्र पथकांनी एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या.
या मोहिमेत मटका-जुगाराचे पाच अड्डे, विनापरवाना देशी दारू विक्रीची दोन ठिकाणे आणि प्रतिबंधित माव्याच्या विक्रीविरोधात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. कासार पिंपळगाव येथील भद्रकाली पान स्टॉलमध्ये सचिन योसेफ थोरात हा कल्याण मटका चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सायंकाळी ५.४५ वाजता छापा टाकला. त्याच्याकडून १ हजार १२० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
वृद्धेश्वर कारखाना बसस्थानकासमोरील कृष्णा पान शॉपमध्ये दीपक रामदास वाळके हा मटका चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ३ हजार ६०० रुपये रोख आणि २५ हजार रुपयांचा मोबाईल असा २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याच बसस्थानकाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये रावसाहेब हौसराव खंडागळे हा मटका चालवत असल्याचे आढळले.
त्याच्याकडून १ हजार ६५० रुपये रोख आणि १५ हजारांचा मोबाईल असा १६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही ठिकाणच्या मटका व्यवसायामागे वाहिद पठाण आणि मद्रास भाई पठाण यांची नावे समोर आली आहेत.
दरम्यान, पाथर्डी पोलिसांनी बाजारतळ येथील गणेश पान सेंटरसमोर कल्याण मटका खेळविणाऱ्या अतीक अब्दुल वहाब शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. टाकळी फाटा परिसरात विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. दुसरीकडे, शहरात प्रतिबंधित माव्याची विक्री होत असल्याच्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले.