

पाथर्डी: पाथर्डीची कोणतीही निवडणूक असो, विधानसभा असो किंवा नगरपरिषद यामध्ये आमदार मोनीका राजळे यांचे वर्चस्व पहायला मिळाले. आगामी निवडणुकीतही भाजपाची ताकद अधिक दिसण्याची शक्यता असली तरीही येथे राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचाही गट तयारीत असल्याचे दिसते आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी (सन 2025-26) प्रारूप प्रभाग रचना सोमवार (दि.18) रोजी जाहीर करण्यात आली. मागील प्रभाग रचनेप्रमाणे यंदाची प्रभाग रचना करण्यात आली आहे. सकाळपासूनच नगरपरिषद कार्यालयात हा आराखडा पाहण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (Latest Ahilyanagar News)
प्रारूप नकाशे पाथर्डी नगरपरिषद कार्यालयातील सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आले. या गडबडीत एक प्रकारे नगरपरिषद निवडणुकीच्या बिगुलाला वाजल्याची चर्चा शहरात रंगली.
2011 च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या 27 हजार 211 इतकी नोंदवली असून, त्याआधारे प्रभागांची विभागणी निश्चित करण्यात आली आहे. यंदा एकूण दहा प्रभाग निश्चित केले असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत.
त्यामुळे एकूण 20 नगरसेवकांची निवड होईल. पूर्वी नगरसेवकांची संख्या 17 होती. यंदा दोन प्रभाग वाढल्याने तीन नगरसेवक अधिक निवडले जाणार आहेत.आता तीन नगरसेवकांची संख्या अधिक होणार आहे.तर नगराध्यक्ष हा सर्व प्रभागातील नागरिकांकडून थेट निवडून दिला जाणार आहे.
प्रभाग आणि लोकसंख्या प्र.क्र.1 - (2591), प्र.क्र.2 - (2709), प्र.क्र.3 - (2568), प्र.क्र.4 - (2632), प्र.क्र.5 - (2959), प्र.क्र.6 - (2779), प्र.क्र.7 - (2976 ) (सर्वाधिक), प्र.क्र.8 - (2559), प्र.क्र.9 - (2975), प्र.क्र.10 - (2463) (किमान).
2011 जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या - 27,211 असून प्रभाग संख्या - 10 तर नगरसेवकांची संख्या - 20 होणार आहे. यापूर्वी 17 नगरसेवक होते. नगराध्यक्ष सर्व प्रभागातून थेट निवडले जाणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या - प्रभाग क्र.7 (2976) तर सर्वात कमी लोकसंख्या - प्रभाग क्र.10 (2463) मध्ये आहे. प्रभागांच्या भौगोलिक सीमा अधिसूचना नगरपरिषद कार्यालयात सूचना फलकावर आजपासून नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
इच्छुक नागरिकांनी हरकती व सूचना 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. या हरकती व सूचनांवर सुनावणीकरिता नागरिकांना स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.मुख्याधिकारी संतोष लांडगे व नगर रचना विभागाचे नरेंद्र तेलोरे यांनी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध केली. दरम्यान माजी नगरसेवक चांद मणियार यांनी या प्रारूप प्रभाग रचनेवर लेखी स्वरुपात हरकत घेतली आहे.