

पारनेर: पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पारनेर पोलिसांनी विशेष मोहीम राबवित यशस्वी कारवाई केली आहे. कारवाईत चोरीच्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या असून, यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली. एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. हस्तगत केलेल्या या सर्व दुचाकींची किंमत 7 लाख 85 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शुभम भाऊसाहेब घुले (वय 22, रा. जांभूत बु., ता. संगमनेर), विशाल लक्ष्मण कातोरे (वय 19, रा. जांभूत बु., ता. संगमनेर), प्रज्योत राजू बिलबिले (वय 24, रा. पळशी, ता. पारनेर) आणि ज्ञानेश्वर विलास आंधळे (वय 36, रा. कर्जुल हर्या, ता. पारनेर) यांना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पारनेर, सुपा, लोणी आणि घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक कोळपे, तसेच पोलिस कर्मचारी डहाळे, धामणे, लगड, वाघ, डोंगरे, बोबडे, साबळे आणि मोबाईल सेलच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी केले आहे.