

श्रीरामपूरः तालुक्यातील दत्तनगर व बेलापूर येथील नियोजित घरकुल कॉलनी राज्यात आदर्श ठरतील, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करु. या दोन्ही कॉलनी पथदर्शक ठरतील, यासाठी प्रयत्न करु, असा शब्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत ते शिष्टमंडळ प्रतिनिधींशी बोलत होते.
दरम्यान, या कॉलनींमध्ये सौर ऊर्जा, पक्के रस्ते, पथदिवे, सांडपाण्यासाठी गटारी आदी नागरी सुविधांबाबत मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून मंत्री गोरे यांच्याशी मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिंदे यांनी सांगितले की, दत्तनगर ग्रामपंचायतीला मिळालेल्या जागेमध्ये एकूण 1,11 घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. घरकुल कॉलनीतील प्रत्येक घराला सोलर सिस्टिम उपलब्ध करून दिल्यास, घरकुल धारकाला फायदा होणार आहे. दरम्यान, यावेळी खंडागळे यांनी बेलापूर येथील घरकुल कॉलनीबाबत सविस्तर माहिती दिली. हरिहरनगर (रामगड) व गायकवाड वस्ती अशा दोन ठिकाणी घरकुल कॉलनी साकारणार आहेत. या कॉलनींचे नामकरण राधाकृष्णनगर व सुजयनगर असे केले आहे.
या कॉलनींसाठी ग्रामविकासकडून सोलर सिस्टिमचे टेंडर काढल्यास, दर्जेदार व कमी किमतीमध्ये सिस्टिम घरकुल धारकांना उपलब्ध होतील, अशी सूचना मंत्री विखे पाटील यांनी मांडली. या चर्चेनंतर विखे पाटील यांच्या सुचनेनुसार पालघर येथील जिल्हा परिषदेला शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध लोकोपयोगी व ग्रामविकास उपक्रमांची माहिती जाणून घेतली, असे शिंदे व खंडागळे यांनी सांगितले.