

नगर : छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी नेवासा फाटा येथे बसची वाट पाहणार्या प्रवाशाला खासगी कारमध्ये लिफ्ट देऊन चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Ahilyanagar News Update)
धर्मनाथ टिकाराम जोहरे (वय 43 वर्षे) हे छत्रपती संभाजीनगर येथे खासगी नोकरी करतात. 17 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथून छ. संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना त्यांना स्विफ्ट कार चालकाने छ. संभाजीनगर येथे सोडतो, असे म्हणून लिफ्ट दिली. कारमध्ये चाकुचा धाक दाखवुन बेदम मारहाण करत रोकड, लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ काढून घेतल्यानंतर त्यांना रस्त्यातच उतरून देण्यात आले. नेवासा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना याप्रकरणी समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,
अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांचे पथक तपासासाठी रवाना केले.
या पथकाने फिर्यादी जोहरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आरोपीचे वर्णन समजून घेतले. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. यातून हा गुन्हा महेश शिरसाठ (रा.म्हसले,नेवासा) याने केल्याचे समोर आले. तो कारने भेंडा येथून नेवासा फाटाकडे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचत महेश आबासाहेब शिरसाठ आणि गोैरव शहादेव शिरसाठ (दोघेही रा. म्हसले, नेवासा) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी कार झडतीत चोरी झालेला लॅपटॉप, मोबाईल, रोकड, गुन्ह्याचे वेळी वापरलेली कार, चाकू असा 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.