

राहुरी: राहुरीत परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुळा धरणाचा साठा 25 हजार 916 दशलक्ष घनफूट (99.67 टक्के) इतका स्थिर राखत उर्वरित आवकेचे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पावसाच्या प्रमाणावर विसर्ग कमी जास्त असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे.(Latest Ahilyanagar News)
गेल्या आठवड्यापासून मुळा धरण लाभक्षेत्रावर परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राहुरीसह पारनेर, संगमनेर, अकोले या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतच आहे. त्यामुळे मुळा धरणातून दोन दिवसांपूर्वी उच्चांकी 17 हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. काल शनिवारी दिवसा काहीसा पाऊस कमी होत असल्याचे पाहून मुळा पाटबंधारे प्रशासनाने विसर्ग कमी केला. 17 हजारांवरून विसर्ग 10 हजार क्यूसेक करण्यात आला होता. त्यानंतर 7 हजार क्युसेक तर त्यानंतर 5 हजार क्युसेक केला गेला. पाऊस कमी होत असल्याने शेवटी विसर्ग हजार क्युसेकपर्यंत कमी केला गेला आहे.
सलग पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुळा पाटबंधारे प्रशासनाने रात्रंदिवस धरणस्थळी खडा पहारा देत आवक व विसर्गाचा समतोल साधला आहे. मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता सलीम शेख यांसह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी मुळा धरणस्थळी उपस्थित राहून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीत करत आहेत.
धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड आदी परिसरात पाऊस पडत नसल्याने आवक मंदावली आहे. धरणाकडे केवळ 795 क्यूसेक इतकीच आवक आहे. परंतु लाभक्षेत्रावर पावसाचा वर्षाव सुरूच असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शनिवारी सायंकाळी पुन्हा पावसाचा वर्षाव वाढल्याने मुळा धरणातून पुन्हा विसर्ग वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मुळा पाटबंधारे प्रशासनाने मुळा नदी काठावरील लोकांना पूर्वीच सतर्कतेचा ईशारा दिलेला आहे. विसर्ग कमी जास्त केला जात असल्याने कोणीही नदी पात्रालगत जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आपल्या जित्राबांनाही नदीकाठ परिसरात सोडू नये असा इशारा दिलेला आहे. मुळा नदी दुधडी भरून वाहत असताना सलग पडणार्या पावसाने राहुरी परिसरातील रस्त्यांवर नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याचे चित्र आहे.
विसर्ग वाढण्याची शक्यता
शनिवारी दिवसा पावसाने थांबा घेतल्याचे वाटत असताना पुन्हा दुपारी पावसाचा वर्षाव सुरू झाला. शनिवारी सायंकाळी पावसाचा वर्षाव वाढला. त्यामुळे मुळा धरण लाभक्षेत्र हद्दीत पावसाचा पुन्हा वर्षाव सुरू झाल्याने धरणातून विसर्ग पुन्हा वाढविला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.