

पाथर्डी: जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्रतिनिधींना देण्यात आलेल्या दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींना अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ आली. शासनाचा निधी लाटण्यासाठीच संबंधित यंत्रणेने जाणीवपूर्वक चहा, नाश्ता, जेवण व इतर सुविधांमध्ये कपात केली असल्याचा गंभीर आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे.
पंचायत समिती, पाथर्डीमार्फत ग्रामपंचायत स्तरावरील (स्तर-3) टप्पा 4 अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसंबंधी स्त्रोत वळकटीकरण व शाश्वतिकरण विषयक प्रशिक्षण 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून अध्यक्ष, सरपंच, सचिव, जलसुरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मागासवर्गीय सदस्य व बचत गट प्रतिनिधी अशा पाच जणांची निवड करण्यात आली होती. नंदुरबार येथील एका संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. लेखी पत्रात प्रशिक्षणार्थींना चहा, नाश्ता, भोजन, वाचन साहित्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
प्रत्यक्षात मात्र प्रशिक्षण नगरपरिषदेच्या सभागृहाऐवजी एका खाजगी मंगल कार्यालयात घेण्यात आले. उपलब्ध जागा अपुरी असूनही दोन गटांना एकत्र बोलावण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षणार्थींना कुठलाही नाश्ता किंवा भोजन पुरविण्यात आले नाही. काही महिलांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, जर अन्नसुविधा पुरवायच्या नव्हत्या तर आम्ही घरूनच डबे करून आणले असते. पण आम्हाला सोयी मिळतील असे सांगून फसवले गेले.
महत्वाचे म्हणजे, या प्रशिक्षणात आशा वर्कर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सोमवार-मंगळवारला एकादशीचा उपवास पाळल्यानंतर बुधवारी अनेक महिलांना उपवास सोडायचा होता. मात्र जेवणच उपलब्ध नसल्याने त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागले. उपस्थितांनी सांगितले की, प्रशिक्षणापेक्षा फोटोसेशनलाच अधिक महत्त्व देण्यात आले.
काहींना जेवण वाढतानाचे दिखाऊ फोटो काढून शासनाकडून बिले काढण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी आरोप केले.या संपूर्ण प्रकाराबाबत विचारले असता पंचायत समिती प्रशासनाने जबाबदारी टाळत, प्रशिक्षणातील सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेकडे होती असा पवित्रा घेतला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष मनीषा डांभे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, उपस्थितांमध्ये अनेक महिला सलग दोन दिवस उपवास करून आल्या होत्या. चहा-नाश्ता-जेवण दिले जाईल असे लेखी कळवूनही प्रत्यक्षात त्यांना उपाशी ठेवण्यात आले. शासनाचा निधी लाटण्यासाठी महिलांची फसवणूक झाली असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.