

नगर: महापौर ज्योती गाडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाचा सपाटा लावला आहे. आज त्यांनी जुन्या महापालिकेतील आरोग्य विभागात अचानक भेट देवून आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. कामकाजाचा आढावा घेतल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच धावपळ झाली. इमारतीतील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करीत जन्म-मृत्यूचे दाखल तत्काळ देण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी वेळी नगरसेवक ऋग्वेद गंधे, संतोष गांधी, महावीर कांकरिया, डॉ. सतीश राजूरकर, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देतो, पण आपल्या स्वतः च्या कार्यालयातच अस्वच्छता असणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. दोन दिवसांत जुन्या महापालिकेतील सर्व विभागांची स्वच्छता करण्यात यावी. महापालिकेच्या प्रतिष्ठेला आणि नागरिकांच्या अपेक्षांना साजेसे कामकाज झाले पाहिजे, अशा सूचना दिल्या.
महापौर गाडे यांना आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर आरोग्य विभागाच्या कामाबद्दल माहिती दिली. राजुरकर यांनी सांगितले की, शहरात 103 आशा सेविका कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जाते. सध्या शहरात 250 लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत नागरिकांची तपासणी नियमित सुरू आहे.
जुन्या सभागृहाची केली पाहणी
महापौर गाडे यांनी विवाह नोंदणी विभागाचीही पाहणी केली. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. महापौरांनी जुन्या महापालिकेतील जळालेल्या सभागृहाचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
नागरिकांना रांगेत ताटकळत ठेवू नका
महापौर ज्योतीताई गाडे यांनी जन्ममृत्यू विभागाची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या म्हणाल्या की, महापालिकेत दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. हा त्रास संपवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा. सर्व रेकॉर्ड संगणकीकृत करा, जेणेकरून दाखले तातडीने देता येतील. त्यांनी सावेडी उपनगरात स्वतंत्र दाखला कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि नागरिकांसाठी ई-सेवा प्रणाली सुरू करण्याची कल्पना मांडली.