

राहुरी: पाच लाखांच्या मर्यादेत खरेदी दाखवून प्रत्यक्षात ३५ ते ४० लाख रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचा आरोप करत आ. प्राजक्त तनपुरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकाच दिवशी एकाच साहित्याची आठ वेळा खरेदी दाखविण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी काल शनिवारी (दि.२८) पत्रकार परिषदेत केली.
विद्यापीठातील खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेचा तपशील मांडताना आ. तनपुरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले. शासनाच्या खरेदी नियमांनुसार पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविणे अपेक्षित असताना, विशिष्ट व्यक्तींना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी खरेदीचे तुकडे पाडल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे खरेदी प्रक्रियेत ज्या फर्मच्या नावाने कोटेशन दाखल केले, त्या फर्म चालकांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कोणतेही कोटेशन दिले नसल्याचे सांगितल्याचा दावा आ. तनपुरे यांनी केला. संबंधित फर्मची नावे, कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून खरेदी व्यवहार उभे केले असतील, तर हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार ठरू शकतो. या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रकार विद्यमान कुलगुरू यांच्या कार्यकाळापूर्वीचा असल्याचे स्पष्ट करत आ. तनपुरे म्हणाले की, या प्रकरणातील गंभीर बाबी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यानंतर संबंधित देयके थांबविल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठाच्या बांधकाम विभागातील कारभाराबाबतही अनेक तक्रारी असून, तेथे मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या संशोधनाचे, कृषी विकासाचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उन्नतीचे केंद्र आहे. अशा संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर संशय निर्माण होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून सार्वजनिक विश्वास टिकविण्याची कसोटी आहे.