

खेड : कायम उसाच्या एकपिकीय उत्पादनाला फाटा देत खेडच्या माळजाईनगरातील शेतजमिनी आता भाजीपाल्याच्या हिरवाईने फुलू लागल्या आहेत. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत विजयसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी रुपाली. ज्यांनी पारंपरिक शेतीपलीकडे पाहत दोडका, काळं वांगं आणि फ्लॉवरच्या शेतीत यशस्वी वाटचाल केली आहे.
सध्या पुण्याच्या बाजारपेठेत काळ्या वांग्याला प्रतिकिलो 35 रुपये, तर दोडक्याला तब्बल 60 रुपयांचा दर मिळतो आहे. फ्लॉवरही लवकरच काढणीस येणार असून, या सर्व पिकांमुळे गायकवाड कुटुंबाचे उत्पन्न वाढले आहे. आज त्यांच्या शेतीत फुललेला भाजीपाला केवळ नफा देणारा नाही, तर एक प्रेरणादायी प्रयोगही ठरतो आहे. गायकवाड यांची शेती केवळ मेहनतीवरच नव्हे, तर योग्य नियोजन आणि बाजारपेठेच्या अभ्यासावर आधारित आहे. शेतीला शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले, तर त्यात खूप शक्यता आहेत.
योग्य नियोजन आणि अपार मेहनत केली, तर शेतकरी स्वतःचे आर्थिक भविष्य घडवू शकतो, असे समाधान गायकवाड व्यक्त करतात. या यशामागे रुपाली गायकवाड यांचाही मोलाचा वाटा आहे. शेतातील कामकाज, पिकांची निगा, फवारणी, काढणी अशा प्रत्येक टप्प्यावर त्या आपल्या नवर्याला खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. ही यशस्वी शेतकरी जोडी आता परिसरातील इतर शेतकर्यांसाठी प्रेरणा ठरली आहे. गायकवाड यांच्या प्रयोगांमुळे शेतीची ओळख आता बदलत चालली असून माळजाईनगरच्या भागात ’हरित क्रांतीची’ नवी पालवी फुलू लागली आहे हे मात्र नक्की!