

पारनेर: देहू येथून निघणारी जगद्गुरू तुकोबारायांची दिंडी अनगड शहा बाबांच्या दर्ग्यावर थांबते. त्याप्रमाणे संत निळोबारायांची दिंडी श्रीगोंदा येथील संत शेख महंमद यांच्या दर्ग्याजवळ मुक्काम करते. हा केवळ योगायोग नाही, तर ही आपली खरी विरासत आहे. संस्कृती आहे, हिंदू-मुस्लिम ऐक्याची गंगा जमुनी तहजीब आहे, आसे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रफिक सय्यद यांनी केले.
श्रीगोंदा येथे पिंपळनेर येथून निघणारी संत निळोबारायांची दिंडी संत शेख महंमद दर्गा परीसरात मुक्कामी होती. डॉ.सय्यद यांनी दिंडीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सय्यद यांनी याप्रसंगी भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकोबांच्या अभंगावर प्रासादिक निरूपण केले. संतांची प्रबोधन परंपरा, महामानवांचे लोकोत्तर कार्य आणि संविधान अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला.
या दिंडीचे प्रवर्तक सोपानकाका औटी महाराज सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ या दिंडीचे आयोजन करीत आहेत. पारनेर शहरातील तराळवाडीतील अनेक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. यावेळी सावित्री फातिमा सद्भावना मंचाचे अॅड संभाजी बोरुडे यांनीही प्रबोधन केले.