

नगर: खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करण्यात यावे. खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कृषी विभागाला दिले. खतांची जादा दराने विक्री, लिंकिंग असे गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारादेखील त्यांनी खत उत्पादक कंपन्यांना व अधिकाऱ्यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सोमवारी (दि.6) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा नियोजन व वितरण व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना खतांचे समान वितरण होईल यादृष्टीने सुयोग्य नियोजन करण्यात यावे. काळाबाजार, साठेबाजी व अनियमितता रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सध्या जिल्ह्यात 19 हजार 674 मेट्रिक टन युरिया, 8 हजार 743 टन डीएपी, 4 हजार 836 टन एमओपी, 88 हजार 691 टन संयुक्त खते तसेच 25 हजार 633 टन एसएसपी असा एकूण 1 लाख 47 हजार 635 मेट्रिक टन खत साठा शिल्लक असून, आगामी हंगामासाठी 7 हजार 900 टन युरिया व 850 टन डीएपी खताचा संरक्षित (बफर) साठा ठेवण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
युरिया बफर साठा
नगर : 513, पारनेर : 537, पाथर्डी : 558, जामखेड : 526, श्रीगोंदा : 571, कर्जत : 558, श्रीरामपूर : 495, राहुरी : 486, नेवासा : 596, शेवगाव : 596, संगमनेर : 660, अकोले : 777, कोपरगाव : 528, राहाता: 450. (मेट्रिक टन)