

नगर: नगर - कल्याण रस्त्यावरील कवडे मळा येथे घरासमोर झोपलेल्या तरुणाचा कुर्हाडीने निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाची अवघ्या 12 तासांत उकल करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने देहरे शिवारातून चार जणांच्या मुसक्या आळवल्या. जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ (वय 19), करण विशाल शिंदे (वय 18, दोघे रा. विळद ता. जि. अहिल्यानगर), गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे (वय 22, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप (वय 18, रा. विळदघाट डोके पेट्रोलपंपाजवळ, ता. जि. अहिल्यानगर, मुळ रा. इंद्रानगर एमएम शाळेमागे पाथर्डी जि. अहिल्यानगर) असे आरोपींची नावे आहेत.
15 जून रोजी रात्री फिर्यादीचा भाऊ प्रशांत भोसले हे राहत असलेल्या शेडचे बाहेर वर्हाड्यांत जाधव मळा, कवडे मळा रोड, नगर कल्याण रोड येथे कोणीतरी अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे पती लक्ष्मण मार्तंड काळे (रा. काळेगाव अमरापू, ता. शेवगाव) याच्यावर कुर्हाडीने वार करून जीवे ठार केले. फिर्यादी झोपेत असताना तोंडावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गंभीर गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुटकुळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार शाहीद शेख, सुनिल पवार, अरविंद भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरील गुन्हा लक्की राहुल वैरळ व त्याच्या साथीदारांनी केला असून ते देहरे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ देहरे येथे सापळा लावून संशयित चार जणांना पकडले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगून जमिनीच्या वादातून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोबाईलसह 20 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासाकामी आरोपींना कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.