

नगर: भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही गंडविल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. याशिवाय खरातने समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत परिवहन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या नावे खाते उघडून त्यातून लाखोंचे आर्थिक व्यवहार केले. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आणखी 13 खात्यांतून 7 कोटींची उलाढाल केली. समता पतसंस्थेत खरातने 57 व्यक्तींच्या पॅन व आधार कार्डचा वापर करून शंभर खाती उघडून त्यात 60 कोटींचा व्यवहार केला आहे. यातील 26 व्यक्तींनी पॅन, आधार आपलेच असून खाते उघडण्यासाठी केलेल्या सह्या मात्र आपल्या नसल्याचा जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शिर्डी पोलिसांनी खरात विरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासाला वेग दिला आहे. प्रामुख्याने समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील 100 खात्यांची पडताळणी पूर्ण केली जात असून त्या चौकशीत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
सामान्य भक्तच नव्हे तर शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. परिवहन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या नावे तीन खाती समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत असून त्यावर सुमारे दीड कोटीचे व्यवहार खरातने केल्याचे समोर आले आहे. सख्ख्या नातलगांची कागदपत्रे वापरून खरातने समता पतसंस्थेत खाती उघडली. या खात्यांत सुमारे एक कोटीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँकेलाही पत्र
भोंदू अशोक खरात हा राहाता परिसरातील महाराष्ट्र आणि नाशिकमधील पंजाब नॅशनल बँकेतील काही खात्यांना नॉमिनी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची पडताळणी करण्याकरिता पोलिसांनी या दोन्ही बँक व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले. संत नागेबाबा, राहाता पीपल्स, स्वामी विवेकानंद आणि बुलढाणा अर्बन बँकेकडेही पोलिसांनी खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची माहिती मागविली असून ती अद्याप पोलिसांना मिळाली नसल्याचे समजते.
‘आत्महत्या’ फेरतपासाच्या दिशेने
शिर्डी संस्थानचा कर्मचारी विकास दिवटे यांनी 2022 मध्ये केलेल्या आत्महत्येचा फेरतपास करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज राजेंद्र दिवटे यांनी वकिलामार्फत शिर्डी पोलिसांकडे दिला आहे. आता पोलिस कायदेशीर प्रक्रियेचे सोपस्कर पूर्ण करून त्या आत्महत्येचा फेरतपास करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.