Ahilyanagar Crime News: तालुक्यातील आढळगाव येथील सुभद्रा बापूराव शिंदे यांच्या घरातून मागील आठवड्यात 4 लाख 89 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या दागिने चोरीस गेले. जवळच्या नातेवाईक महिलेनेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मीरा शांताराम काळे (रा.आढळगाव) असे आरोपीचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी सुभद्रा शिंदे आणि आरोपी मीरा काळे या नातेवाईक आहेत. गेल्या वर्षभरापासून आरोपी काळे ही शिंदे यांच्याकडे शेतीकामासाठी येत होती. दोघी नातेवाईक असल्याने मीरा काळे यांचा फिर्यादी शिंदे यांच्या घरात वावर होता.
गेल्या 14 ते 23 ऑक्टोबरदरम्यान शिंदे यांचे किचनरुममधील बेसिनच्या खाली खड्डा करून फरशीखाली ठेवलेले 4 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत असताना आढळगाव येथील खबर्याने मीरा काळे हिने सोन्याचे नवीन दागिने खरेदी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी काळे हिच्याकडे विचारपूस केली असता, तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांपुढे तिची दिशाभूल करणारी माहिती फारकाळ टिकली नाही. तिने ही चोरी केल्याची कबुली देत श्रीगोंदा शहरातील दोन सराफ व्यावसायिकांना चोरीचे दागिने विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी हे दागिने जप्त केले. या महिलेस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिस नाईक आप्पासाहेब तरटे, गोकुळ इंगवले, संदीप राऊत, सचिन वारे, संदीप आजबे, संदीप शिरसाठ, आनंद मैड, महिला पोलीस कर्मचारी अस्मिता शेळके यांनी महत्वाची भूमिका बजावली.
दागिने विकून केले नवीन दागिने
आरोपीने दागिने चोरल्यानंतर एकालाच दागिने न विकता दोन सराफाना हे दागिने विकले होते. त्या बदल्यात तिने नवीन सोन्याचे दागिने खरेदी केले होते. विशेष म्हणजे तिने खरेदी केलेले सोन्याचे दागिने आपल्या मैत्रिणींनाही दाखवले होते.
उसने पैसे केले परत
आरोपी मीरा काळे हिने फिर्यादी सुभद्रा शिंदे यांच्याकडे काही पैसे उसने घेतले होते. दागिने विकून पैसे आल्याने तिने शिंदे यांच्याकडून उसने घेतलेले पैसे परत केले.