माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या दोन सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या सहकार खात्याने 300 कोटी रुपये निधी दिला आहे. ज्या कामासाठी निधी दिला त्यासाठी तो वापरला असेल तर ठीक, अन्यथा त्या निधीची चौकशी करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाणमंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
भाजपमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविली आहे. त्यापार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या वक्तव्याला मोठे महत्त्व आहे. इंदापूरच्या निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्यासाठी दिलेल्या पैशांचे काय केले, असा जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत विचारणा केली असता मोहोळ म्हणाले की, केंद्र सरकार कायमच सहकार क्षेत्राच्या पाठीमागे राहिले आहे. सहकार वाढीबरोबर समृद्ध झाले पाहिजे अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना व्यक्ती, पक्ष पाहिला जात नाही. निकषांमध्ये बसतात की नाही एवढेच पाहिले जाते. यामुळेच पक्ष न बघता मदत केली जाते.
हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले नाहीत आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. ज्या कामासाठी निधी दिला त्यासाठी वापरला असेल तर ठीक अन्यथा त्या पैशांची चौकशी करण्यात येईल, असे मोहोळ यांनी सांगितले.