

जामखेड शहर: साडेतेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांसह एका हॉटेल चालकाने अत्याचार केला. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर ही घटना उघड झाली. या प्रकरणी मुलीचा बाप व हॉटेल चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जामखेड पोलिसांनी या प्रकरणी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात केला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुलीच्या आईचे एक वर्षापूर्वी निधन झाले. मुलगी संगमनेर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकते, तर तिचे आजी, आजोबा व वडील संगमनेर तालुक्यातच एका गावात राहतात. दरम्यान, ऑक्टोबर 2025 मध्ये दिवाळीच्या सुट्यांमध्ये तिचे आजी-आजोबा व वडील जामखेड तालुक्यात ऊस तोडण्यासाठी आले होते. तेथे मुलगी सुट्यांसाठी आली होती. या भागातील एका हॉटेलवरील नळावर ती आजीसह पाणी भरण्यासाठी जात असे. त्या वेळी हॉटेल चालकाची तिच्यावर नजर पडली.
मुलीचे घरचे ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्यावर हॉटेलचालक जयदत्त सदाशिव कात्रजकर ऊर्फ नाना (रा. कुसडगाव, ता. जामखेड) याने मुलीवर जवळच्या मक्याच्या शेतात नेऊन तीन वेळा अत्याचार केला आणि कोणाला सांगितल्याल मारून टाकण्याची धमकी दिली. नंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पीडित मुलीसह तिचे वडील व कुटुंबीय उसतोडणीसाठी पाटोदा (जि. बीड) तालुक्यात गेले. तेथे असताना मुलीच्या वडिलांनी तिच्यावर नोव्हेंबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत अनेक वेळा अत्याचार केला.
दरम्यान, पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी एप्रिल 2026 मध्ये वार्षिक परीक्षेसाठी आश्रमशाळेत गेली. तेव्हा मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याची सूचना आश्रमशाळेतर्फे तिच्या आजीला करण्यात आली. संगमनेर ग्रामीण रुग्णालयात केलेल्या या चाचणीत मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले. याबाबत माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या बापाला जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.
सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव यांनी विश्वासात घेऊन मुलीची चौकशी केली, तेव्हा आरोपी हॉटेल चालक जयदत्त सदाशिव कात्रजकर व मुलीचा बाप अशा दोघांची नावे निष्पन्न झाली. मुलीच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपींना जामखेडचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे तपास करीत आहेत.